NCP MP Sunetra Ajit Pawar: काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे मराठवाड्यात अक्षरश: कहर केला आहे. बीड, धाराशिव, हिंगोली, जालना जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रकल्पांमधून विसर्ग सोडल्याने गावागावांमध्ये पाणी शिरले आहे. उरलीसुरली पिकेही खरडून निघाली आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत ५ हजार ३२० गावांतील पिकांचा चिखल केला. दोन दिवसांत विविध जिल्ह्यात २२ गावांचा संपर्क तुटला. ७० जणांना सुरक्षित ठिकाणी हलविले. यातच राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या खासदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारी एक पोस्ट लिहिली आहे.
सुनेत्रा अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्टमध्ये लिहितात की, माझ्या लातूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनो व पदाधिकाऱ्यांनो... ही अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, आपल्यातील माणुसकी जागी ठेवणे नक्कीच आपल्या हातात आहे. आज आपल्या भागात पावसाने थैमान घातले आहे. या संकटात आपल्या बळीराजाच्या डोळ्यादेखत त्याची मुकी जनावरे वाहून जात आहेत, ही बातमी ऐकून मन सुन्न झाले आहे. शेतकऱ्यासाठी त्याचे जनावर हे केवळ एक प्राणी नसतो, तर त्याच्या कुटुंबाचा सदस्य असतो. त्याचे हे नुकसान कधीही भरून न येणारे आहे. अशावेळी त्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे.
मी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते की...
पुढे सुनेत्रा पवार लिहितात की, या कठीण काळात, मी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते की, चला, आपल्या गावागावात, प्रत्येक गल्ली-बोळात पोहोचूया. पाण्यात अडकलेल्या, मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपण आधार बनूया. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी, जेवणाची आणि निवाऱ्याची सोय करण्यासाठी दिवस-रात्र एक करूया..! शासन आणि प्रशासन त्यांच्या पातळीवर काम करत आहेच, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कठीण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पण ही फक्त त्यांची जबाबदारी नाही, तर एक माणूस म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून आपलीही जबाबदारी आहे. आज आपल्या माणुसकीची खरी परीक्षा आहे.
कमेकांच्या पाठीशी उभे राहूया
चला, एकजुटीने या संकटाचा सामना करूया. पक्ष, पद, आणि विचार या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ 'माणूस' म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहूया. आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी एकत्र येऊया. मला खात्री आहे, आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील ३ दिवसात हलका ते मध्यम आणि २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. कोकण, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यामुळे मॉन्सून सक्रिय राहील, परतीच्या प्रवासाबाबत अंदाज वर्तविणे शक्य नसल्याचे डॉ. सानप यांनी स्पष्ट केले.