Navneet Rana Latest News: नवनीत राणा दाम्पत्याला सोमवारपर्यंत तुरुंगातच रहावे लागणार; जामिन अर्जावरील सुनावणी लांबली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 18:12 IST2022-04-30T18:11:52+5:302022-04-30T18:12:13+5:30
मुंबईच्या सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात राणांच्या जामिन अर्जावर सुनावणी सुरु आहे. राणांकडून वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा बाजू मांडत आहेत. तर सरकारी वकील प्रदीप घरत सरकारच्या वतीने युक्तीवाद करत आहेत.

Navneet Rana Latest News: नवनीत राणा दाम्पत्याला सोमवारपर्यंत तुरुंगातच रहावे लागणार; जामिन अर्जावरील सुनावणी लांबली
मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या आव्हानावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. पोलिसांवर जातीयवादाचे आरोप करून त्या फसल्या आहेत. यातच आज त्यांच्या जामिन अर्जावरील सुनावणी पुढे गेली असून आज काहीही निर्णय झालेला नाही. यामुळे राणा दाम्पत्याला आता सोमवारपर्यंत तुरुंगातच रहावे लागणार आहे.
मुंबईच्या सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात राणांच्या जामिन अर्जावर सुनावणी सुरु आहे. राणांकडून वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा बाजू मांडत आहेत. तर सरकारी वकील प्रदीप घरत सरकारच्या वतीने युक्तीवाद करत आहेत. राणांवर दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा गुन्हा हा मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हटल्याने दाखल करणे चुकीचे आहे, असा युक्तीवाद राणांच्या वकिलांनी केला आहे. तर राणा हे समाजातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे घरत यांनी म्हटले आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्येही पोलिसांनी राणा यांना जामिन देण्यास विरोध केला होता.
राणा हे खासदार, आमदार आहेत. त्यांच्यावर दाखल केलेला खटला हा निरर्थक आहे. ते कुठेही पळून जाणार नाहीत. पोलिसांनीही त्यांची कोठडी मागितलेली नाही. त्यांना लहान मुले आहेत, त्याना काही अटींवर जामिन द्यावा, अशी मागणी राणांच्या वकिलांनी केली आहे. आता न्यायालयाने सुनावणी झाल्यावर कामकाज थांबविले असून पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना सोमवारपर्यंत तरी तुरुंगातच रहावे लागणार आहे.