उद्धव ठाकरे पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये; सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 12:54 IST2022-01-21T12:32:53+5:302022-01-21T12:54:23+5:30

उत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर; एकूण ९ जणांचा समावेश

Naveen Patnaik Is Most Performing Cm uddhav thacekray also in the list | उद्धव ठाकरे पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये; सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश

उद्धव ठाकरे पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये; सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश

मुंबई: आजारपणामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सध्या फारसे सक्रीय नसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कायम आहे. देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये ठाकरेंच्या नावाचा समावेश झाला आहे. इंडिया टुडे माध्यम समूहानं केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा समावेश नाही.

इंडिया टुडेनं प्रत्येक राज्यातील लोकांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी आहे याबद्दल विचारणा केली. ४३ टक्क्यांहून अधिक मतं मिळालेल्या ९ मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक प्रथम क्रमांकावर आहेत. पटनायक यांच्या कामावर ७१.१ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पटनायक यांच्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या कामगिरीवर ६९.९ टक्के जनता समाधानी आहे. तिसऱ्या नंबरवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आहेत. त्यांच्या कारभारावर ६७.५ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक लागतो. ६१.८ टक्के लोक त्यांच्या कामकाजावर समाधानी आहेत.

केरळचे मुख्यमंत्री (६१.६ टक्के) यादीत पाचव्या, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (५७.९ टक्के) सहाव्या स्थानी आहेत. ९ मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचे केवळ एक मुख्यमंत्री आहेत. हेमंत विस्व सर्मा सातव्या क्रमांकावर आहेत. आसाममधील ५६.६ टक्के जनतेनं त्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (५१.४ टक्के), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (४४.९ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

Web Title: Naveen Patnaik Is Most Performing Cm uddhav thacekray also in the list