नाट्यसंमेलनाध्यक्षाला हवं ते करता येत नाही : कीर्ती शिलेदार यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 07:00 IST2018-12-05T07:00:00+5:302018-12-05T07:00:04+5:30
नाट्य संमेलनाध्यक्ष हा सत्कार समारंभ, बक्षिस वाटप यातच अडकून पडतो याची सल वाटते.

नाट्यसंमेलनाध्यक्षाला हवं ते करता येत नाही : कीर्ती शिलेदार यांची खंत
नम्रता फडणीस
पुणे : नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणून अत्यंत समाधानाचे क्षण अनुभवास मिळाले आहेत. पण संमेलनाध्यक्षाचा अधिकांश कालावधी हा सत्कार समारंभ, पुरस्कार वितरण यामध्येच खर्ची होतो, याचे वाईट देखील वाटते. इतकी वर्षे संगीत रंगभूमीची मनापासून सेवा केल्यानंतर तरूण रंगकर्मींना मार्गदर्शन करणारी शिबिर, कार्यशाळा घ्याव्यात अशी माझी मनापासून इच्छा होती आणि आजही आहे. पण तशी संधी फारशी मिळाली नसल्याची खंत 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केली. यंदाच्या वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकांमुळे नाट्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीचा कालावधी लांबला. एप्रिलमध्ये कीर्ती शिलेदार यांची नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. नाट्य संमेलनही जूनमध्ये पार पाडले. आता पुढच्या वर्षी निवडणुकींचा काळ आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास आगामी ९९ व्या अ.भा.म. नाट्य संमेलनाला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता संमेलन काहीसे लवकर होण्याची चर्चा नाट्यवतुर्ळात आहे. तसे झाल्यास कीर्ती शिलेदार यांना संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभराचा कालावधी देखील कदाचित मिळू शकणार नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार डॉ. प्रेमानंद गज्वी यांची सन्मानाने निवड करण्यात आली . यंदाच्या वर्षी आगामी नाट्य संमेलनासाठी नऊ निमंत्रणे आली असली तरी संमेलन स्थळ आणि तारखांची घोषणा होणे अद्यापही बाकी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कीर्ती शिलेदार यांच्याशी लोकमतने संवाद साधला असता कधी एकदा संमेलनाध्यक्षपदाचा कालावधी संपतोय याची वाट पाहात असल्याची मिस्किल टिप्पणी त्यांनी केली. तुम्ही बक्षिस वाटा आणि कटा एवढयाच दृष्टीकोनातून संमेलनाध्यक्षाकडे पाहिले जात आहे, याचे खरच वाईट वाटते. प्रत्यक्षात जे काम करायचे आहे ते राहून जाते. जे अध्यक्ष निवडले जातात त्यांना त्यांचे अनुभव लोकांबरोबर शेअर करणे, शिबिरं घेणे जास्त आवडेल, पण तसे होत नाही. नाट्य संमेलनाध्यक्ष हा सत्कार समारंभ, बक्षिस वाटप यातच अडकून पडतो याची सल वाटते.
परंतु हे जरी खरे असले तरी नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणून काही समाधानाचे क्षणही वाट्याला आले आहेत. दिल्लीमध्ये प्रसिद्ध नाटककार अभिराम भडकमकर यांच्या ह्यबालगंधर्वह्ण या हिंदी पुस्तकाच्या प्रकाशनाला जायला मिळाले. तिथे हिंदीत संगीत रंगभूमी म्हणजे काय हे मांडण्याची सुवर्णसंधी मिळाली. अनेक मान्यवर व्यक्ती आपणहून संवाद साधायला आल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच व्यासपीठावर बसण्याचा सुखद अनुभव मिळाला. हे केवळ नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणूनच वाटयाला आल्याबददलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
-----------------------------------------------------------
संमेलनातच नाट्यसंमेलनाध्यक्षाची मुस्कटदाबी
मुलुंडच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये अध्यक्ष या नात्याने माज्या मुलाखतीला तासभर वेळ दिला जाणे अपेक्षित होते. पण आता बास करा असा निरोप आयोजकांकडून आला. नाट्यसंंमेलनाध्यक्षाच्या मुलाखतीपेक्षा पारितोषिक वितरणाला जास्त महत्व दिले गेले याचे वाईट वाटते.संंमेलनातच नाट्यसंमेलनाध्यक्षाच्या झालेल्या या मुस्कटदाबीचा अनुभवही कीर्ती शिलेदार यांनी सांगितला. मात्र, संमेलनाला आलेल्या रसिकांचा रसभंग नको म्हणून नाराजी जाहीर केली नसल्याचेही त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले.