‘दशक्रिया’ कादंबरीवरील चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 04:59 IST2017-04-08T04:59:12+5:302017-04-08T04:59:12+5:30
ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड लिखित ‘दशक्रिया’ कादंबरीवर आधारित चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

‘दशक्रिया’ कादंबरीवरील चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार
औरंगाबाद : ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड लिखित ‘दशक्रिया’ कादंबरीवर आधारित चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘चंदेरी पडद्यावर साकारण्यात आलेल्या माझ्या शब्दांचा एवढा मोठा सन्मान होताना पाहून खूप आनंद वाटतोय, अशी प्रतिक्रिया बाबा भांड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मराठी भाषेतील सर्वाेत्कृष्ट चित्रपट, मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहअभिनेता तर संजय कृष्णाजी पाटील यांना पूर्वप्रकाशित साहित्यावर आधारित सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला. पैठणच्या घाटावर दशक्रिया विधीवर उपजीविका भागविणाऱ्या भानुदास म्हणजेच भान्याची ही गोष्ट. दहा-बारा वर्षांच्या या मुलाच्या निरागस डोळ्यातून समाजात असलेल्या जाती-परंपरा-रुढींचे केलेले अचूक टिपण यामध्ये नोंदविण्यात आले आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, आदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, नंदकिशोर चौघुले यांच्या भूमिका असून आर्या आढाव हा बालकलाकार ‘भान्या’च्या मुख्य भूमिकेत आहे.
माझी पात्रं जिवंत झाली!
लेखक म्हणून शब्दबद्ध केलेली पात्रे पटकथाकार, दिग्दर्शक आणि सर्व कलाकारांनी अतिशय संवेदनशीलपणे साकारून त्यांना जिवंत केले. प्रथम हा चित्रपट पाहिला तेव्हा शब्दरुपी असणारी ही लोकं आज माझ्यासमोर चालू-बोलू लागली होती. आपल्या कलाकृतीला योग्य तो न्याय मिळाला याचे समाधान आहेच, असे ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी सांगितले.
नवदिग्दर्शकासाठी यापेक्षा मोठी सुरुवात दुसरी काय असू शकते? बाबा भांड यांनी माझ्यावर विश्वास दाखवून ‘दशक्रिया’वर चित्रपट बनविण्याची संधी दिली. संपूर्ण टीमचे हे यश आहे, असे चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप पाटील म्हणाला. (प्रतिनिधी)
>‘लोकमत’ कनेक्शन
१९९४ साली ‘लोकमत’च्या रविवार पुरवणीतून बाबा भांड लिखित ‘दशक्रिया घाटावरची मुलं’ ही गोष्ट क्रमश: प्रकाशित झाली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे १९९५ साली त्यांनी या किशोरकथेला कादंबरीचे स्वरूप देऊन ‘दशक्रिया’ नावाने प्रकाशित केले.
>निर्णय योग्य
पटकथा वाचल्यानंतर आपण ‘केशव भटा’ची भूमिका करावी हा निर्णय घेतला. आज तो निर्णय सत्कारणी लागला आहे.
- मनोज जोशी, अभिनेते