Nashik: ...तोपर्यंत नाशिकचा पालकमंत्री मीच, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
By दिनेश पाठक | Updated: March 23, 2025 17:04 IST2025-03-23T17:03:01+5:302025-03-23T17:04:44+5:30
Nashik: जेथे पालकमंत्री नियुक्त नाही तिथला पालकमंत्र्याचा पदभार मुख्यमंत्र्याकडेच असतो. त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री सध्या तरी मीच असून त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्याचे कोणतेच काम थांबणार नाही.

Nashik: ...तोपर्यंत नाशिकचा पालकमंत्री मीच, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
-दिनेश पाठक
नाशिक - जेथे पालकमंत्री नियुक्त नाही तिथला पालकमंत्र्याचा पदभार मुख्यमंत्र्याकडेच असतो. त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री सध्या तरी मीच असून त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्याचे कोणतेच काम थांबणार नाही. २०२७ ला भरणारा हा कुंभमेळा आस्था अन् तंत्रज्ञानाचा संगम असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे मुलाखतीत सांगितले.
कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यंग इंडियन्सच्या नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेचा समारोप रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली. महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप त्यांनी मुलाखतीत सांगितला. सीआयआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तरंग खुराणा आणि आनंद नरसिंहन यांनी त्यांच्याशी संवाद साधला. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे वाटचाल करत आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३६ टक्के असणार आहे. राज्याची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था २०२९ मधेच होईल यासाठी रोडमॅप तयार आहे. बाजारपेठ व्यवस्थेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी काम सुरू केले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरजुंसाठी राज्यात २० लाख घरे उभारण्यात येत आहे. त्याचा लाभ विविध माध्यमातून ग्रामीण भागाला होत असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या तयारीस उशिरच
नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उशिर झाल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. २०२० पासूनच तयारी सुरू व्हायला हवी होती. परंतू तरी आमची गाडी सुसाट असून प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी १८ तास काम करून हेतू साध्य करीत आहे. कुंभमेळ्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील जागा भाड्याने घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.