Nashik Municipal Corporation Election 2025: नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘विजयी संकल्प सभे’त भाजप नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. प्रभू श्रीरामांना वंदन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक ओळखीवर भर दिला. ते म्हणाले, काही जण नाशिकमध्ये येऊनही प्रभू श्रीरामांचे स्मरण करत नाहीत. नाशिकमध्ये येऊन ज्यांनी राम मांडला नाही, त्यांच्यात राम उरला नाही. जो रामाचा नाही, तो कोणाचाच होऊ शकत नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
कुंभमेळा कोणालाही थांबवता येणार नाही
भाषणात 2015 च्या नाशिक कुंभमेळ्याचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, कमी वेळ असूनही आमच्या सरकारने 2015 चा कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडला होता. सनातन धर्माची आणि संस्कृतीची ओळख असलेला कुंभमेळा कोणीही थांबवू शकत नाही. कुंभमेळ्याची प्राचीन परंपरा आहे. अकबराच्या बापाचा बाप जन्माला येण्याआधीही नाशिकमध्ये कुंभमेळा भरत होता, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
नाशिकसाठी मोठे पायाभूत विकास प्रकल्प
सीएम फडणवीस पुढे म्हणाले, नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. कारण जिथे विमानतळ असते, तिथेच उद्योग येतात. तसेच नाशिकच्या भविष्यासाठी नवीन रिंग रोड तयार करत आहोत, जो अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गांना जोडला जाईल. नाशिक-सोलापूर-अक्कलकोट 6 पदरी कॉरिडोर, नाशिक-पुणे 6 पदरी महामार्ग आणि इतर रस्त्यांची निर्मिती करून नाशिकला वाढवण बंदराशीही जोडणार आहोत; जेणेकरून जागतिक दर्जाच्या या बंदराचा फायदा नाशिकला होईल. नाशिक हे मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक व टेक्नोलॉजी हब म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस आहे, ज्याने नाशिकमधील हजारो तरुणांना रोजगार मिळेल.
नाशिक- पुणे रेल्वेचा विस्तार करत आहोत. तसेच आमणे फाट्यापासून एक रोड तयार केला जाणार आहे जो ईस्टर्न फ्रीवेला जोडला जाईल, त्यामुळे मुंबईला पोहोचण्यासाठी नाशिककरांना जास्त वेळ लागणार नाही. यासोबतच शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. गंगापूर धरणाच्या नवीन पाईपलाईनच्या माध्यमातून नाशिकचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गोदावरी स्वच्छ करण्याकरिता कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Web Summary : Fadnavis emphasizes Nashik's religious identity, vowing infrastructure development. He asserted Kumbh Mela's ancient roots, predating even Akbar's lineage, and highlighted connectivity projects for economic growth.
Web Summary : फडणवीस ने नाशिक की धार्मिक पहचान पर जोर दिया, बुनियादी ढांचे के विकास का वादा किया। उन्होंने कुंभ मेले की प्राचीन जड़ों पर जोर दिया, यहां तक कि अकबर के वंश से भी पहले की, और आर्थिक विकास के लिए कनेक्टिविटी परियोजनाओं पर प्रकाश डाला।