Narmada River ST Bus Accident: 'बस दुर्घटना अतिशय दुर्दैवी, गिरीश महाजन घटनास्थळाकडे रवाना', देवेंद्र फडणवीसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 14:45 IST2022-07-18T14:44:45+5:302022-07-18T14:45:35+5:30
मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे महाराष्ट्राची एसटी बस नर्मदा नदीपात्रात कोसळली.

Narmada River ST Bus Accident: 'बस दुर्घटना अतिशय दुर्दैवी, गिरीश महाजन घटनास्थळाकडे रवाना', देवेंद्र फडणवीसांची माहिती
मुंबई:मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे मोठा अपघात झाला आहे. महाराष्ट्राची एसटी बस इंदुरहून अमळनेरकडे येत होती, यावेळी ती पुलावरून नर्मदा नदीपात्रात कोसळली. यामध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2022
'घटना अतिशय दुर्दैवी'
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, 'मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात झालेली बस दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेत मोठ्य प्रमाणात लोक बेपत्ता झाले आहेत. मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या संपर्कात आहोत. त्यांनी संपूर्ण प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पाठवून कारवाई सुरू केली, त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो.'
'कुटुंबीयांचया दुःखात सामील'
'या घटनेनंतर आपलेही काही लोक त्या ठिकाणी आम्ही पाठवले आहेत. गिरीश महाजन सध्या घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातही व्यवस्था केली आहे, मृतांच्या नातेवाईकांना संपूर्ण माहिती दिली जात आहे. आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तिथल्या कलेक्टरशी माझे बोलणे झाले, त्यांनी व्हिडिओ कॉलवर मला तिथली परिस्थिती दाखवली. प्रकार गंभीर आहे, आम्ही या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत. आता जे बेपत्ता आहेत, त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.'