बाराशे वर्षांपासून नांदतेय कोरेगाव!

By Admin | Updated: March 22, 2015 22:59 IST2015-03-22T22:59:47+5:302015-03-22T22:59:47+5:30

शिलालेखाच्या मजकुरातून स्पष्ट : शिलाहार काळाच्या पूर्वीपासून अस्तित्व; ‘जिज्ञासे’तून शोधला प्राचीन इतिहास--लोकमत विशेष

Nandtey Koregaon for 12 hundred years! | बाराशे वर्षांपासून नांदतेय कोरेगाव!

बाराशे वर्षांपासून नांदतेय कोरेगाव!

राजीव मुळये - सातारा जुनी बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, साताररोडचा कारखाना आणि वाघा घेवडा अशा नानाविध गोष्टींनी चर्चेत असणारे कोरेगाव तिळगंगेच्या काठी सुमारे बाराशे वर्षांपूर्वीपासून नांदत असल्याचे पुरावे सापडले आहेत. शिलाहार काळाच्याही पूर्वी कोरेगाव अस्तित्वात होते, अशी साक्ष देणारा शिलालेखावरील मजकूर सातारच्या जिज्ञासा इतिहास संशोधक मंडळाने उजेडात आणला आहे. कोणत्याही गावाच्या सामाजिक, आर्थिक विकासाबरोबर त्याचा चेहरामोहरा बदलणे क्रमप्राप्त असते. गावाची रचना आणि विस्तार बदलतो; मात्र तेथील धार्मिक स्थळे सहसा बदलत नाहीत. भाडळे खोऱ्यात उगम पावणाऱ्या तिळगंगा नदीकाठी वसलेल्या कोरेगाव शहराचे प्राचीन स्वरूप यातूनच समोर आले. तथापि, सातारा गॅझेटिअरमध्येही या प्राचीन दिवसांचा चार ओळीच उल्लेख आढळतो. जुनी पेठ, बाजारपेठ, जानाई गल्ली, महादेवनगर, टेक ही कोरेगावाची जुन्या, मध्ययुगीन वस्तीची ठिकाणे. कोरेगावच्या जुन्या मंदिरांच्या माध्यमातून इतिहास शोधण्याचा प्रयत्न धैर्यशील पवार, विक्रांत मंडपे, सागर गायकवाड, नीलेश पंडित, शीतल दीक्षित, योगेश चौकवाले यांनी केला. भैरवनाथ आणि केदारेश्वर मंदिराची पाहणी करण्यात आली.
केदारेश्वर मंदिर हे तिळगंगेच्या काठावरील प्राचीन मंदिर आहे. त्याचे बांधकाम पाहिले असता वेगवेगळ्या काळांत त्याचा जीर्णोद्धार झाल्याचे लक्षात येते. त्यासाठी जुन्या मंदिराचे काही अवशेष, विरगळीचा वापर झाला. या शिळा, विरगळी, सतीशिळा यांचा अभ्यास केला असता कोरेगावला किमान बाराशे वर्षांचा समृद्ध इतिहास असल्याचे स्पष्ट होते. शिलाहार घराण्याने सातारा-कोल्हापूर प्रांतात असंख्य किल्ले बांधले. विशाळगड, अजिंक्यतारा, चंदन-वंदन, रोहिडा, वैराटगड, पांडवगड, केंजळगड, कमळगड, सज्जनगड शिलाहारांचीच निर्मिती. गंडरादित्याने खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर बांधायला सुरुवात केली. त्याने अनेक हिंदू, जैन आणि बुद्धमंदिरेही बांधली. कोल्हापूर-सातारा जिल्ह्यांतील प्रदेशांवर राज्य करणाऱ्या शिलाहारांनी आपले वर्णन ‘तगरपुरवराधीश्वर’ असे केले आहे.


असा आहे शिलालेख...
केदारेश्वर मंदिराच्या आवारात एक प्राचीन शिलालेख सिमेंटच्या चौथऱ्यात बसविला आहे. तो चार फूट उंच आणि पावणेदोन फूट रुंदीचा असून, वरील भागात चंद्र, सूर्य कोरले आहेत. त्याखाली एका चौकटीत शिवलिंग,
खड््ग, गोवत्स कोरले आहे. गोवत्सच्या चौकटीखाली सात ओळींचा शिलालेख दृष्टीस पडतो. त्याखालील
भाग सिमेंटच्या चौथऱ्यात गाडला गेला आहे.
शिलालेख हे शिलाहारकालीन दानपत्र लेख मानले जातात. त्यावरील सूर्य-चंद्र हे संबंधित भूदान ‘आचंद्रसूर्य नांदो’ या अर्थाने योजले जातात. चौकटीतील शिवलंग, गायवासरू ही चिन्हे मंदिर व्यवस्थापनासाठी दिलेल्या दानाचे प्रतीक आहे. या दानलेखाची सुरुवात ‘स्वस्तिश्री जयश्चयाभ्युदयश्च जयत्यमलनानार्त्थ प्रतिपत्ति’ या अक्षरांनी होते. लेखातील देवनागरी लिपीच्या धाटणीवरून व संस्कृत भाषेवरून हा काळ
दहाव्या शतकापर्यंत मागे
जातो.

असा आहे शिलालेख...
केदारेश्वर मंदिराच्या आवारात एक प्राचीन शिलालेख सिमेंटच्या चौथऱ्यात बसविला आहे. तो चार फूट उंच आणि पावणेदोन फूट रुंदीचा असून, वरील भागात चंद्र, सूर्य कोरले आहेत. त्याखाली एका चौकटीत शिवलिंग,
खड््ग, गोवत्स कोरले आहे. गोवत्सच्या चौकटीखाली सात ओळींचा शिलालेख दृष्टीस पडतो. त्याखालील
भाग सिमेंटच्या चौथऱ्यात गाडला गेला आहे.
शिलालेख हे शिलाहारकालीन दानपत्र लेख मानले जातात. त्यावरील सूर्य-चंद्र हे संबंधित भूदान ‘आचंद्रसूर्य नांदो’ या अर्थाने योजले जातात. चौकटीतील शिवलंग, गायवासरू ही चिन्हे मंदिर व्यवस्थापनासाठी दिलेल्या दानाचे प्रतीक आहे. या दानलेखाची सुरुवात ‘स्वस्तिश्री जयश्चयाभ्युदयश्च जयत्यमलनानार्त्थ प्रतिपत्ति’ या अक्षरांनी होते. लेखातील देवनागरी लिपीच्या धाटणीवरून व संस्कृत भाषेवरून हा काळ
दहाव्या शतकापर्यंत मागे
जातो.


जतन गरजेचे
शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या प्रदेशावर राज्य करीत होते. करहाट म्हणजे कऱ्हाडच्या सिंदकुळाला हरवून शिलाहारांनी काही काळ कऱ्हाडमधून राज्य केले. नंतर राजधानी कोल्हापूरला हलविली. त्यांची इष्टदेवता कोल्हापूरची महालक्ष्मी होती. तिचा वरप्रसाद आपल्याला लाभल्याचे शिलाहार राजे ताम्रपटाद्वारे सांगतात. अशा राजाने दिलेल्या दानाचा पुरावा म्हणजेच कोरेगावला आढळलेला शिलालेख होय. जिल्ह्यात आतापर्यंत उजेडात आलेला हा एकमेव शिलालेख असल्याने त्याचे जतन शासकीय पातळीवर होणे अत्यावश्यक बनले आहे.


‘गोधावाहिनी’ पार्वतीची मूर्ती
अमरकोशात पार्वतीची २४ नावे दिली आहेत. हेमावती, पार्वती, आर्या, सती ही नावे तिची जन्मकथा दर्शवितात. शिवा, भवानी, रुद्राणी, मृद्राणी ही नावे पार्वती ही शिवाची अर्धांगिनी असल्याचे दर्शवितात. कात्यायनी, चंडिका, अंबिका ही दैत्यसंहारासाठी घेतलेल्या अवतारांची नावे मानली जातात. कोरेगावातील प्राचीन अवशेषांत शिव-गौरीची मूर्ती आढळली असून, या मूर्तीतील शिव चार हातांचा आहे. पार्वती दोन हातांची आहे. शिवाने एका पायाची मांडी घातली असून, दुसरा पाय त्याच्या वाहनावर म्हणजे नंदीवर ठेवला आहे. शिवाच्या दुसऱ्या मांडीवर गौरी बसलेली असून तिच्या दुसऱ्या पायाखाली तिचे वाहन ‘गोधा’ म्हणजे घोरपड आहे. अशी गोधावाहिनी पार्वती अतिशय दुर्मिळ समजली जाते. सामान्यत: आठव्या शतकापासून अशा मूर्तींच्या निर्मितीस सुरुवात झाली असावी, असे मत ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक नोंदवितात. अशी दुर्मिळातील दुर्मिळ मूर्ती कोरेगावात असणे ही सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट ठरणार आहे.

Web Title: Nandtey Koregaon for 12 hundred years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.