भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:17 IST2025-09-25T13:16:28+5:302025-09-25T13:17:06+5:30
Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
लोकसभा निवडणूक आटोपून जवळपास सव्वा वर्ष लोटलं तरी भाजपासा आपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडता आलेला नाही. नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र असं असलं तरी पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या नावावर एकमत होत नाही आहे. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये विचारणा करण्यात आली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांपर्यंत काम करणार आहे. तसेच महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही.
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड ही योग्य वेळी केली जाईल. भाजपाच्या अध्यक्षपदासाठी कुठल्याही प्रकारचा पेच निर्माण झालेली नाही. भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव चालवणं हे केवळ बातम्यांसाठी केलं जातं. प्रसारमाध्यमातून अशी अनेक नावं चालवली गेली आहेत. त्यातील काही नावं अशीही होती, ज्याबाबत ऐकून मलाही आश्चर्य वाटलं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
यावेळी पुढील राजकीय वाटचालीबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी भाजपामध्ये काम करतो. या पक्षात कोण मुंबईत राहणार, कोण दिल्लीला जाणार, कोण नागपूरमध्ये राहणार किंवा कुणी कुठे जाणार, हे कुणी एक व्यक्ती ठरवत नाही. तर हे सर्व पक्ष ठरवतो. असं माझं मन आहे.