मुंबईपेक्षा नागपूरच्या रेस्टॉरंट ऑन व्हीलला अधिक पसंती, मध्य रेल्वे लवकरच आणखी चार ठिकाणी सुरु करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 06:52 IST2022-10-26T06:51:18+5:302022-10-26T06:52:42+5:30
मध्य रेल्वेवर असेच प्रकल्प उभारण्यासाठी ७ ठिकाणे निश्चित केली आहेत.

मुंबईपेक्षा नागपूरच्या रेस्टॉरंट ऑन व्हीलला अधिक पसंती, मध्य रेल्वे लवकरच आणखी चार ठिकाणी सुरु करणार
मुंबई : मध्य रेल्वेने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईत, तर फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू केले आहे. मात्र, मुंबईच्या तुलनेत नागपूरच्या रेस्टॉरंट ऑन व्हीलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेने तिकीट भाडेशिवाय महसूल योजनेअंतर्गत ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू केले असून आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती या चार स्थानकांवर रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू करणार आहे.
मध्य रेल्वेवर असेच प्रकल्प उभारण्यासाठी ७ ठिकाणे निश्चित केली आहेत. मध्य रेल्वेकडून मुंबईत १८ ऑक्टोबर २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहिले ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू करण्यात आले होते. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वेचा डबा वापरून बनवण्यात आले आहे. रेस्टॉरंटच्या आतील भागात रेल्वे-थीमद्वारे भिंतीवर रेल्वेची ऐतिहासिक माहिती देण्यात आली आहे. त्याला बोगी-वोगी असे नाव देण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये १० टेबल असून ४० ग्राहक जेवण करू शकतात. आजपर्यंत अंदाजे १ लाख २५ हजार ग्राहकांनी येथे जेवणाचा आनंद घेतला आहे.
३ फेब्रुवारी २०२२ रोजी नागपूर येथे दुसरे रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू करण्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर रुळांवर रेल्वेच्या एका डब्यात हे रेस्टॉरंट आहे. येथे रेल्वे कोचचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आला आहे. डबा सुशोभीत करताना नागपूर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांचा विचार करण्यात आला आहे. तसेच डब्याचा मूळ रंग आणि रचना कायम ठेवण्यात आली आहे. या रेस्टॉरंटमध्ये १० टेबल आणि ४० ग्राहक सामावू शकतात. आजपर्यंत अंदाजे १ लाख ५० हजार पर्यटक येथे आले आहेत.
या ठिकाणी लवकरच रेस्टॉरंट ऑन व्हील
मध्य रेल्वेने आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती या चार स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, लोणावळा, नेरळ, इगतपुरी, दादर आणि माथेरान अशा ७ ठिकाणी ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.