नागपूर हिंसाचार : ‘त्यांचा’ रोखठोक हिशेब होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 09:59 IST2025-03-19T09:58:33+5:302025-03-19T09:59:03+5:30
दंगलखोरांच्या हल्ल्यात तीन पोलिस उपायुक्तांसह ३५ पोलिस जखमी झाले. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा रोखठोक हिशेब होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत निवेदन करताना दिला.

नागपूर हिंसाचार : ‘त्यांचा’ रोखठोक हिशेब होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
मुंबई : नागपूरमध्ये सोमवारी घडलेली दंगल हा पूर्वनियोजित कट होता. त्याला कुणाचे समर्थन होते याची चौकशी केली जाईल. दंगलखोरांच्या हल्ल्यात तीन पोलिस उपायुक्तांसह ३५ पोलिस जखमी झाले. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा रोखठोक हिशेब होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत निवेदन करताना दिला. दरम्यान, नागपूरच्या घटनेवरून गदारोळ झाल्यामुळे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कामकाज दोनदा तहकूब केले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत नागपूरच्या घटनेमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही अशी शंका येते, अशी टिप्पणी केली. पोलिसांवर हल्ले झाले, दुकाने जाळली, वाहने पेटविली. सरकारमधील मंत्रीच बेजबाबदार विधाने करत आहेत. राज्यात जातीय विष पेरण्याचे काम भूषणावह नाही, असे ते म्हणाले. तर भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी हा पूर्वनियोजित कट होता. या घटनेची पूर्ण चौकशी करून मास्टर माईंड कोण आहे ते शोधून काढावा, अशी मागणी केली.
कट रचले जात आहेत...
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देताना राज्य अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारचे कट रचले जात आहेत, असा आरोप केला. गेल्या काही दिवसांत अफवांना बळी पडून राज्यात दुर्दैवी घटना घडत आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही. राज्यातील आक्रमकांच्या खुणा पुसून टाकल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
दोन्ही बाजूचे आमदार आले आमने-सामने
नागपूर हिंसाचाराचे पडसाद विधानभवनाच्या आवारात उमटले. सत्ताधारी आमदारांकडून औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी, तर विरोधकांकडून मंत्री नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन झाले. दोन्ही बाजूचे आमदार आमने-सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली.