Nagpur: मंत्री, आमदारांसह अनेक साई भक्त बाबांच्या चरणी लीन
By नरेश डोंगरे | Updated: December 19, 2024 23:53 IST2024-12-19T23:52:11+5:302024-12-19T23:53:53+5:30
Nagpur News: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वर्धा मार्गावरील श्री साईबाबा मंदीरात गेल्या तीन दिवसांपासून व्हीव्हीआयपी भक्तांची मांदियाळी दिसून येत आहे.

Nagpur: मंत्री, आमदारांसह अनेक साई भक्त बाबांच्या चरणी लीन
- नरेश डोंगरे
नागपूर - लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वर्धा मार्गावरील श्री साईबाबा मंदीरात गेल्या तीन दिवसांपासून व्हीव्हीआयपी भक्तांची मांदियाळी दिसून येत आहे. विधानसभा उपसभापतींसह सत्तापक्षातील मंत्री, आमदार आणि विरोधी पक्षातील बडे नेतेही बाबांच्या चरणी लिन झालेले बघायला मिळत आहे.
प्रती शिर्डी असा मान असलेले साईंचे हे मंदीर देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील बाबांची मुर्ती अत्यंत सुबक आणि सजीव आहे. या मंदीरात साईंच्या मुर्ती स्थापनेला ३ डिसेंबरला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मंदीरही आकर्षक असून परिसरही प्रशस्त आहे. विशेष म्हणजे, हे मंदीर मुख्य मार्गाला लागून आहे. येथे देश-विदेशातील भाविकांची वर्षभर वर्दळ असते. सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांसह वेगवेगळ्या पक्ष तसेच गटांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येत नागपुरात आले आहेत. यातील बाबांचे भक्त असलेली मंडळी मंदीरात येऊन बाबांच्या चरणी लिन होताना दिसत आहे. मंगळवारी रात्री ७.३० वाजता विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे साई मंदीरात पोहचल्या. त्यांनी बाबांचे दर्शन घेऊन साईंची मनोभावे पूजा केली. मंदीर कमिटीचे सचिव अविनाश शेगांवकर यांनी त्यांना बाबांची शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
आज गुरुवारी सकाळी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साई मंदीरात पोहचले. त्यांनी बाबांची पूजाअर्चा करून काही वेळ मंदीरात घालवला. बाबांचे निस्सिम भक्त म्हणून विखे पाटील ओळखले जातात. नागपुरात असले की विखे पाटील येथील साई मंदीरात हमखास दर्शनाला पोहचतात. यावेळीही त्यांनी येथे येऊन अनेकदा बाबांचे दर्शन घेतले आहे.
उध्दव सेनेचे आमदार अनिल परब हे सुद्धा आज सकाळी १० वाजता मंदीरात पोहचले आणि त्यांनी साईंच्या चरणी माथा टेकला. दुपारी १ वाजता विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ तर सायंकाळी ६ च्या सुमारास शिवसेनचे आमदार दीपक केसरकर साई मंदीरात पोहचून बाबांच्या चरणी लिन झाले.
उच्चाधिकाऱ्यांचीही प्रार्थना
आजी-माजी मंत्री आणि आमदारांसोबतच राज्य सरकारमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेल्या अनेक सचिव दर्जाच्या आणि अन्य शिर्षस्थ अधिकाऱ्यांनीही बाबांच्या दर्शनासाठी गर्दी चालवली आहे. विधीमंडळाची जबाबदारी सांभाळून ही मंडळी साई मंदीरात येऊन प्रार्थना करीत आहेत.