"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:37 IST2025-12-21T17:37:17+5:302025-12-21T17:37:41+5:30
"ही भारताच्या इतिहासातील पहिली निवडणूक असेल, ज्यात एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कुणावरही एक सूतभरही टीका न करता, त्यांचा पक्ष विजयी होतो. एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही तर पावती आहे."

"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
मी यापूर्वीच भाकीत केले होते की, एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यांपैकी ७५ टक्के हे महायुतीचे निवडून येतील. त्याच पद्धतीचा कौल जनतेने दिला आहे. विशेतः भारतीय जनता पक्ष हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, हे देखील पुन्हा एकदा अधोरेखित झाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, गेल्या २०-२५ वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही. जो आज भाजपा आणि महायुतीला मिळाला आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
फडणवीस म्हणाले, "आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, जवळपास १२९ नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत. आपण बघितले तर, आम्हा तिघांचे मिळून जवळपास ७५ टक्के नगराध्यक्ष आहेत. तसेच नगरसेवकांचा विचार केल्यास भारतीय जनता पक्षाने नवा विक्रमच नोंदवला आहे. २०१७ साली आम्ही क्रमांक एकचा पक्ष होतो, त्यावेळी आमचे (भाजपा) १६०२ नगरसेवक होते. आता त्याच्या दुपटीहूनहीअधिक ३३२५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे, एकूण नगरसेवकांच्या तुलनेत ४८ टक्के एवढे एकट्या भाजपचे निवडून आले आहेत. अर्थात प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळाले आहे."
"विशेषतः आमचे सहकारी एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांचेही मी अभिनंद करतो. त्यांच्याही पक्षाने अतिशच चांगला परफॉर्मन्स दिला आहे. एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स आम्ही रिपिट केला आहे. पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही निडवणूक होत होती आणि या निवडणुकीत एक मोठं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं या बद्दल मी रविंद्र चव्हाण यांचेही अभिनंदन करतो. हा एक अभूतपूर्व विजय मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे, २०१७ पेक्षाही हा विजय मोठा आहे. गेल्या २०-२५ वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही. जो आज भाजपा आणि महायुतीला मिळाला आहे, असेही पडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले, "सर्वात महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत मी अत्यंत सकारात्मक प्रचार केला. एकाही सभेत एकाही व्यक्तीच्या विरोधात अथवा पक्षाच्या विरोधात बोललो नाही, केवळ विकासावर मते मागीतली, आम्ही काय केले आणि काय करणार आहोत, हे सांगितले आणि त्याला सर्व मतदारांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. ही भारताच्या इतिहासातील पहिली निवडणूक असेल, ज्यात एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कुणावरही एक सूतभरही टीका न करता, त्यांचा पक्ष विजयी होतो. एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही तर पावती आहे."
दरम्यान, महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठे समर्थन दिले आहे, असे म्हणत, मी महाराष्ट्राच्या जनेतेचे आभार मानले, असेही फडणवीस म्हणाले.