शिवसेनेपेक्षा माझा पक्ष इतर राज्यांमध्ये स्ट्राँग, त्यांना यश मिळणं अशक्य - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 14:02 IST2022-03-11T14:02:04+5:302022-03-11T14:02:31+5:30
महाराष्ट्रात शिवसेना भाजपसोबत राहिली नाही, त्यांच्या लोकसभेच्या तीन चार जागाही निवडून येतील का नाही ही शंका आहे : आठवले

शिवसेनेपेक्षा माझा पक्ष इतर राज्यांमध्ये स्ट्राँग, त्यांना यश मिळणं अशक्य - रामदास आठवले
गुरुवारी देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता अन्य चारही राज्यांमध्ये भाजपनं मुसंडी मारली. तर शिवसेनेनं उभ्या केलेल्या उमेदवारांना यश मिळालं नाही. यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला टोला लगावला असून आपला पक्ष इतर राज्यांमध्ये शिवसेनेपेक्षा अधिक बळकट असल्याचं म्हटलं आहे.
"महाराष्ट्रातशिवसेना भाजप सोबत राहिली नाही, त्यांच्या लोकसभेच्या तीन चार जागाही निवडून येतील का नाही ही शंका आहे," अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "शिवसेनेला बाहेरच्या राज्यात यश मिळण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्यापेक्षा माझा पक्ष हा इतर राज्यांमध्ये बळकट आहे. मणिपुरमध्ये आमचा उमेदवार केवळ १८३ मतांनी पराभूत झाला. शिवसेनेला बाहेरील राज्यात यश मिळणं अशक्य आहे," असंही ते म्हणाले.
"महाराष्ट्रातशिवसेना भाजपसोबत राहीली नाही, तर लोकसभेच्या तीन-चार जागाही निवडून येतील का नाही ही शंका आहे. तर विधानसभेलाही त्यांचं पानीपत होईल. महाविकास आघाडीचे तीन पक्ष परस्परांविरोधात उभे राहणारे पक्ष आहेत. येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आणि अन्य महापालिका निवडणुकांमध्येही प्रचंड यश आम्हाला मिळेल. आगामी लोकसभेत विधानसभेतही आम्हाला चांगल्या जागा मिळतील. विधानसभेतही आमचं सरकार येणार याचा आम्हाला विश्वास आहे आणि महाविकास आघाडीला प्रचंड नुकसान होईल," असंही ते म्हणाले.