माझा प्राण वर्षामध्ये नाही..., मला वर्षा सोडताना यातना झाल्या नाही, पण...; उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं मनातलं दुःख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 21:52 IST2025-03-09T21:50:40+5:302025-03-09T21:52:04+5:30
Uddhav Thackeray : "मला नेमकं ते कळत नाहीये, अरे तुम्हाला कळतय का की, तुम्ही कोणाची हुजरेगिरी करताय, कोणाच्या पालख्या वाहताय?"

माझा प्राण वर्षामध्ये नाही..., मला वर्षा सोडताना यातना झाल्या नाही, पण...; उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं मनातलं दुःख
माझं काही तरी मुख्यमंत्री पद गेलं, अरे मी सोडून दिलं ते. कुठेही माझा जीव जळला नाही, कारण माझा प्राण वर्षामध्ये नाही, माझा प्राण तुमच्यामध्ये आहे. मला वर्षा सोडताना यातना नाही झाल्या, पण जेव्हा माझा कट्टर शिवसैनिक दुर्दैवाने आपल्यापासून जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो, तेव्हा ज्या यातना होतात, इंगळ डसतात ना, हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही, म्हणून मला काय आनंद होतो, अशातला भाग नाहीये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, मला नेमकं ते कळत नाहीये, अरे तुम्हाला कळतय का की, तुम्ही कोणाची हुजरेगिरी करताय, कोणाच्या पालख्या वाहताय? असा प्रश्नही यावेळी त्यांनी केला. ते ईशान्य मुंबईच्या वतीने आयोजित शिवसेनेच्या निर्धार शिबिरात बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, "इतकी वर्षे आपण ज्यांना डोक्यावर घेऊन दिल्ली दाखवली, दिल्लीत बसल्यानंतर ताबडतोब त्याच वर्षी २०१४ ला लोकसभा जिंकली त्यांनी (भाजपने) आणि विधानसभेमध्ये युती तोडली, तेव्हा आपण हिंदू होतो की नव्हतो? मग काय केलं होतं आपण असं पाप? एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे की, तेव्हा त्यांच्यावर जबाबदारी दिली होती की, आता ही युती तोडा. म्हणजे "गरज सरो वैद्य मरो". त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबरोबर गेलो. का? कारण हिंदुत्व? मग १९ साली पुन्हा ते अमित शहा वगैरे घरी आले, त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली, त्याच्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा गद्दारी करून आपलं सरकार पाडलं. पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक माझ्यासोबत आहेत."
मी कोण आहे? मी कोणीच नाहीये... -
ठाकरे म्हणाले, "मी काय दिले तुम्हाला? काही देऊ शकत नाही. आज माझ्याकडे काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे की, मी काही देऊ शकत नाही. उद्या, उद्याचं उद्या. पण आता तरी हातात काय आहे? काहीच नाही माझ्या हातामध्ये. तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलात, तरीसुद्धा सोबत राहिलात. आणि केवळ हे माझं काही कौतुक नाहीये, हे हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुखांनी जे काही त्यांची पुण्याई उभी केलेली आहे त्याचे हे सर्व चित्र आहे. मी कोण आहे? मी कोणीच नाहीये आणि म्हणून मी अभिमानाने पुढे चाललेलो आहे."
तरीसुद्धा मी ठाम उभा आहे, हातामध्ये मशाल घेऊन -
"निवडणूक आयोगाने आपल्यावर अन्याय केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाहीये. एक एक न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत. पुढच्या वर्षी लवकर, तसे पुन्हा जात आहेत. ५० वर्षे..., ७० वर्षे... आमच्या केसला, आता ७५ वर्षे झाली, त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय, रौप्य महोत्सव करतोय, सुवर्ण महोत्सव, का? अहो केस केलीय, माहित नाही तुम्हाला? शंभर वर्ष झाली आमच्या केसला, निकालच लागत नाही अजून! ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत आणि तरीसुद्धा मी ठाम उभा आहे, हातामध्ये मशाल घेऊन," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.