मुरुड चक्रीवादळामुळे १८ घरांची छपरे उडाली

By Admin | Updated: May 29, 2014 00:54 IST2014-05-29T00:54:57+5:302014-05-29T00:54:57+5:30

मुरुड तालुक्यातील अंबोली ग्रामपंचायत हद्दीतील तिस्ते आदिवासी वाडी व उंडरगाव येथील १८ घरांची छपरे जोरदार वार्‍यामुळे उडून जावून सुमारे ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे

Murud hurricane caused 18 roof-houses | मुरुड चक्रीवादळामुळे १८ घरांची छपरे उडाली

मुरुड चक्रीवादळामुळे १८ घरांची छपरे उडाली

मुरुड-जंजिरा : मुरुड तालुक्यातील अंबोली ग्रामपंचायत हद्दीतील तिस्ते आदिवासी वाडी व उंडरगाव येथील १८ घरांची छपरे जोरदार वार्‍यामुळे उडून जावून सुमारे ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच या चक्रीवादळामुळे दोन व्यक्ती जखमी सुद्धा झाल्या आहेत. या चक्रीवादळाचा फटका मोकळ्या जागेत असणार्‍या तिस्ते आदिवासी वाडीला सर्वाधिक बसला. येथे बहुतांशी आदिवासी समाजाची घरे आहेत. इंदिरा घरकुल आवास योजनेंतर्गत ही घरे बांधण्यात आली आहेत. सायंकाळी ५.४५ च्या सुमारास जोरदार वारा सुटला व आकाशात काळे ढग जमून थोडासा पाऊस पडला. परंतु अचानक सुसाट सुटणार्‍या वार्‍यामुळे सिमेंट पत्र्याची छपरे पार उडून जावून फुटली व पावसात या आदिवासी कुटुंबांवर एक नैसर्गिक संकट आले आहे. जोरदार वार्‍यामुळे बागायत जमिनीत नारळाची झाडे सुद्धा उन्मळून पडली आहेत. या नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे अंबोली तलाठी यांच्यामार्फत करण्यात आले आहेत. या चक्रीवादळामुळे वजनदार वस्तू अंगावर पडल्याने एक मुलगा व वयोवृद्ध व्यक्ती जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अंबोली ग्रामपंचायत सरपंच मनोज कमानणे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी चक्रीवादळामुळे गरीब व आदिवासी कुटुंबांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगितले. शासनाने या कुटुंंबांना तातडीने आर्थिक मदत करून त्यांची घरे पुन्हा बांधून द्यावीत अशी मागणी केली. एका घराचे कमीत कमी पंधरा हजार नुकसान झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या वादळामुळे मुरुड तालुक्यातील वीज गायब झाली होती. रात्री १०.३० नंतर विजेचे आगमन झाले. शंकर जाधव, प्रकाश वाघमारे, सुंदर वाघमारे, सुरेश जाधव, नारायण पवार, विठोबा वाघमारे, बाबू वाघमारे, जयश्री वाघमारे, रेश्मी वाघमारे आदींच्या घरांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र म्हात्रे यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Murud hurricane caused 18 roof-houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.