नागपूर - राज्यातील २८८ नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगला कौल मिळाला असून ४१ नगराध्यक्षांसह १००६ नगरसेवक विजयी झाले आहेत. नगरसेवकांच्या २ हजार जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. नगरपालिका निवडणुकीतील हा झंझावात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसेल, असा विश्वास व्यक्त करत लोकशाहीविरोधी भाजपा महायुतीच्या हुकूमशाही व ठोकशाहीला जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, निवडणूका निष्पक्ष, पारदर्शी, करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण निवडणूक आयोगाची भूमिका पाहता त्यांनी विश्वासार्हतेला हरताळ फासला आहे. वोटचोरीचा मुद्दा काँग्रेस पक्षाने उचलून धरला, शेवटी मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत, हे त्यांना मान्य करावे लागले पण पुढे त्यात काही सुधारणा झालेली दिसत नाही. निवडणूक आयोगाचे काम पाहता ते सत्ताधारी पक्षाच्या सांगण्याने काम करत आहेत हे दिसते. मतदार याद्यात घोळ, मतदान प्रक्रियेसाठी तारीख पे तारीख, अर्ज भरून घेताना विरोधकांची अडवणूक व सत्ताधाऱ्यांना मोकळीक दिली. रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्यास मुभा दिली आहे, म्हणजे एकीकडे पैसा वाटा आणि मतदान केंद्राकडे दुर्लक्ष असा हा प्रकार आहे. आम्ही सुधारणार नाही अशीच भूमिका निवडणूक आयोगाची दिसत आहे. निवडणूक आयोग, प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुटवले असून नंगानाच सुरू आहे.
नगरपालिका व आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा व मित्रपक्षांनी साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर केला असून त्यांच्या मदतीला पोलीस, मंत्री, त्यांचे पीए तर आहेतच पण निवडणूक आयोगही त्यांना मदत करत आहे. यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भर पडली आहे. नार्वेकर यांनी त्यांचे भाऊ, बहिण व वहिनी यांना बिनविरोध करण्यासाठी अत्यंत असभ्य वर्तन केले आहे, गुंडगिरी केली, विरोधकांना दमदाटी केली, त्याचे सीसीटीव्हीचे फुटेज प्रशासनाने गायब केले. सर्वबाजूने तक्रार झाल्यानंतर चौकशीचे आदेश दिले पण त्यातून नार्वेकर यांच्यावर कसलीच कारवाई केलेली नाही. बिनविरोध निवडणुकीच्या बाबतीत काँग्रेस पक्षाने आपली भुमिका स्पष्ट केलेली असून जेथे बिनविरोध झाले तेथे नोटाचा पर्याय ठेवा अशी मागणी आहे आणि न्यायालयात जाण्याबाबत कायदेतज्ञांशी विचारविमर्श करू असे सपकाळ म्हणाले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, विलासराव देशमुख यांचे व्यक्तीमत्व व योगदान हे मोठे व निर्विवाद आहे. भाजपा, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस व रविंद्र चव्हाण यांना सत्तेचा प्रचंड अहंकार आहे. मोदी स्वतः ईश्वर असल्यासारखे वागतात व त्यांचे चेलेचपाटे हे असभ्य, विकृत विधान करत असतात, काँग्रेस पक्ष या विधानाचा निषेध करतो. पण भाजपाची मानसिकता पाहता फक्त विलासराव देशमुख यांच्याच आठवणी त्यांना पुसायच्या नाहीत तर अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे योगदानही त्यांना पुसून टाकायचे आहे. त्यांना फक्त मोदी व शाह ही दोनच नावे ठेवायची असून रेशीमबागेतील हेडगेवार व गोलवलकर यांचे फोटे काढून मोदी शाह यांचेच फोटो त्यांना लावायचे आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
Web Summary : Harsvardhan Sapkal urges voters to defeat BJP's autocracy in upcoming elections. Congress performed well in recent municipal elections. Sapkal alleges election irregularities, accusing the Election Commission of bias. He criticized BJP leaders' disrespectful comments and attempts to erase past leaders' legacies.
Web Summary : हर्षवर्धन सपकाल ने मतदाताओं से आगामी चुनावों में भाजपा की तानाशाही को हराने का आग्रह किया। कांग्रेस ने हाल के नगरपालिका चुनावों में अच्छा प्रदर्शन किया। सपकाल ने चुनाव अनियमितताओं का आरोप लगाया, चुनाव आयोग पर पक्षपात का आरोप लगाया। उन्होंने भाजपा नेताओं की अपमानजनक टिप्पणियों और अतीत के नेताओं की विरासत को मिटाने के प्रयासों की आलोचना की।