मनस्तापाचा कोकण रेल्वे ट्रॅक

By Admin | Updated: October 8, 2014 03:26 IST2014-10-08T03:26:40+5:302014-10-08T03:26:40+5:30

कोकण रेल्वेच्या वालोपे स्टेशनजवळ मुंबईला येणाऱ्या मालगाडीचे डबे घसरले आणि पुन्हा एकदा कोकण रेल्वेचा बोऱ्या वाजला.

Munastapacha Konkan Railway track | मनस्तापाचा कोकण रेल्वे ट्रॅक

मनस्तापाचा कोकण रेल्वे ट्रॅक

मुंबई : कोकण रेल्वेच्या वालोपे स्टेशनजवळ मुंबईला येणाऱ्या मालगाडीचे डबे घसरले आणि पुन्हा एकदा कोकण रेल्वेचा बोऱ्या वाजला. मागील वर्षाच्या आॅक्टोबर महिन्यापासून ते यंदाच्या आॅक्टोबर महिन्यातपर्यंत रेल्वे रुळावरून घसरण्याची आतापर्यंतची ही पाचवी घटना आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे कोकण रेल्वे आणि त्यामार्गे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असून हा मनस्ताप थांबणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकच रेल्वेमार्ग उपलब्ध असल्याने एखादी दुर्घटना कोकण रेल्वेमार्गावर घडल्यास कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प होते. त्याचा फटका मध्य रेल्वेलाही बसतो. यामुळे दुहेरी मार्ग असावा अशी मागणी होत असून, मध्य रेल्वेकडून दुहेरी मार्गाचे काम वेगाने केले जात आहे. मध्य रेल्वेकडून त्यांच्या मार्गावर दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, पेण ते कासूदरम्यान साधारण चार महिन्यांत तर कासू ते रोहापर्यंत साधारण सहा ते आठ महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे.
पेण ते कासूदरम्यानच्या दुहेरी मार्गासाठी मध्य रेल्वेकडून नुकताच मेगाब्लॉक घेण्यात आला होता. कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरण केले जाणार आहे. हे दुहेरीकरण संपूर्ण न करता टप्प्याटप्प्यात केले जाणार असून, त्याचा सर्व्हेही पूर्ण करण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्याचा दावा जरी केला जात असला, तरी सुरू असलेल्या कामावरून कोकण आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गांवरील दुहेरीकरणाच्या कामास पूर्णत्वासाठी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे दिसते.
चिपळूण : या अपघातामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर कामथे रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली होती तर मंगल एक्स्प्रेस सावर्डे रेल्वे स्थानकात उभी होती. या दोन्ही गाड्या परत पाठविण्यात आल्या. मार्गावरील सर्व गाड्या आज रद्द करण्यात आल्या. काही गाड्या पुणे मार्गे वळविण्यात आल्या आहेत. खेर्डी येथील रेल्वे पूलाचे ग्रील तुटून पडले. ट्रॅकखालील खडी खाली कोसळली. रूळांखालचे सिमेंटचे पोल चिरडून गेले. लोखंडी रूळ वाकडेतिकडे झाले. काही डब्यांची चाके निखळली. कोकण रेल्वेचे अधिकारी व इंजिनीअर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. डबे बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Web Title: Munastapacha Konkan Railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.