महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या मुमताज शेख

By संतोष आंधळे | Published: October 3, 2022 08:16 AM2022-10-03T08:16:11+5:302022-10-03T08:17:35+5:30

नवरात्रीच्या निमित्ताने लोकमत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देणार आहे. या सदरातून आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...

mumtaz shaikh who fought for women rights | महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या मुमताज शेख

महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या मुमताज शेख

Next

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिक्षण जेमतेम नववीपर्यंत... त्यात १५व्या वर्षी लग्न आणि १६व्या वर्षी मातृत्व... नवऱ्याचा जाच वेगळाच... या सर्वांनी अगदी पिचून जाऊन एखादीने वाकडी वाट धरली असती. मात्र, त्यांनी धीरोदात्तपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा निश्चय केला. नवऱ्याच्या जाचापासून थोडा काळ का होईना सुटका व्हावी या हेतूने वस्तीतील संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि आज त्याच ११ हजार कुुटुंबांच्या आधार बनल्या. त्या आहेत चेंबूरच्या मुमताज शेख... बीबीसीने निवडलेल्या जगातील १०० महत्त्वाकांक्षी महिलांच्या यादीतील एक... एकेकाळी स्वतः कौटुंबिक हिंसाचाराला बळी ठरलेल्या मुमताज महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांचे संसार टिकविण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींत ११ टक्के पुरुषांचाही समावेश आहे.  

२००० साली कोरो इंडिया या सामाजिक संस्थेत काम करत असताना मुमताज यांनी महिलांमध्ये साक्षरता वाढावी यासाठी प्रयत्न केले. स्वत:पासूनच त्यांनी सुरुवात केली. नवऱ्याला तलाक दिला. त्यानंतर समाजाने त्यांना बेदखल केले. आपल्या लहानगीला घेऊन मुमताज जमेल त्या स्थितीत भाड्याच्या घरात राहिल्या. त्याच काळात मुमताज यांना दोन वर्षांची फेलोशिप मिळाली. त्यामुळे दोन पैसे गाठीला आले. त्याच आधारावर काम करत मुलीचा सांभाळ करत वस्त्यांतील महिलांच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचे त्यांचे काम सुरू राहिले. 

‘राइट टू पी’ चळवळ 

२०११ साली संस्थेतर्फे ‘राइट टू पी’ मोहीम राबविण्यास मुमताज यांनी सुरुवात केली. अनेक स्त्रियांनी त्यात सहभाग घेतला. मोहिमेचे फलित म्हणजे शासन दरबारी हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. सरकारी दफ्तरी  या विषयाची नोंद झाली तसेच ज्या महिला आजही या हक्कासाठी भांडतात त्यांना न्याय मिळतो. पण या विषयावर मोठी जनजागृती झाली असून मोठ्या प्रमाणात शौचालय उभारण्याचे काम या काळात झाले.      

संघर्षाबद्दल मुमताज सांगतात...

‘माझ्या आजवरच्या प्रवासात कोरो इंडिया संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. माझे संपूर्ण शिक्षण संस्थेत आल्यानंतरच पूर्ण झाले. संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांवर आवाज उठवू शकले. या काळात याच संस्थेत कार्यरत असलेल्या राहुल गवारे यांच्याशी विवाह झाला. सध्या आम्ही महिलांवरील हिंसाचार या विषयावर काम करीत आहोत. या अंतर्गत महिलांच्या तक्रारींचे निवारण करणे, समुपदेशन करणे, वाद मिटवणे इत्यादी कामे करत असतो. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे वाद कौटुंबिक न्यायालयापर्यंत जातात त्यांना कायदेशीर मदत पोहचविण्याचे कामही आम्ही करतो. या कामात सुजाता भिसे आणि विजूबाई भोसले या सहकाऱ्यांची मोलाची मदत मिळते. आतापर्यंत आम्ही मुंबई, नाशिक आणि  अहमदनगर या भागातील ११,२०० कुटुंबापर्यंत पोहचलो आहोत.’

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mumtaz shaikh who fought for women rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.