मुंबई - मुंबई विद्यापीठाने मालवणी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश केला. या भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनात रविवारी दिले.रविवारी सकाळी दादर येथील नायर सभागृहात मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्राच्या सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. पेडणेकर यांनी सांगितले की, कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा सिंधुदुर्ग दौरा केला होता, त्यानंतर तेथे विद्यापीठाने महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला. येथील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस)चे विद्यार्थी आणि जलदूत राजेंद्र सिंह यांच्या संकल्पनेतून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा उपक्रम तेथे राबविण्यात येत आहे. या जिल्ह्यानंतर लवकरच हा प्रकल्प रायगड आणि पालघर येथे राबविण्यात येणार आहे. मालवणी तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता झाराप येथे २५ एकरांत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरून, आपल्या मातीत राहून ही पिढी भूमीला अधिक वृद्धिंगत करेल. या वेळी कुलगुरूंनी अस्सल मालवणी भाषेत उपस्थितांशी संवाद साधला.
मालवणी भाषा टिकवण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रयत्नशील - सुहास पेडणेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 03:06 IST