मुंबई ते अहमदाबाद केवळ दोन तासांत...; बुलेट ट्रेनच्या पाच किमी लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 07:03 IST2025-09-21T07:02:44+5:302025-09-21T07:03:37+5:30
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या काळात रखडलेले काम आता लवकर पूर्ण करण्याचे ध्येय आहे.

मुंबई ते अहमदाबाद केवळ दोन तासांत...; बुलेट ट्रेनच्या पाच किमी लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण
मुंबई - बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर केवळ २ तास ७ मिनिटांत कापता येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दर ३० मिनिटांनी ट्रेन पकडता येणार आहे.
त्यामुळे अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांना स्टेशनवर ताटकळत उभे राहावे लागणार नाही. तसेच, या ट्रेनचे तिकीट स्टेशनवरच उपलब्ध होईल, अशी माहिती रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी दिली. घणसोली ते शिळफाटादरम्यान ५ किमी लांबीच्या बोगद्याचे काम रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
असे सुरू आहे बोगद्याचे काम
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसी आणि शिळफाटादरम्यानच्या २१ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्यापैकी ५ किमी लांबीचा बोगदा शिळफाटा आणि घणसोलीदरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (एनएटीएम) वापरून बांधला जात आहे, तर उर्वरित १६ किमी लांबीचा बोगदा टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरून बांधला जात आहे. या बोगद्यात ठाणे खाडीखालील ७ किमी लांबीच्या भागाचाही समावेश आहे.
🚄 Major milestone for the Bullet Train Project!
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 20, 2025
Breakthrough achieved in the 4.88 km section of Bharat’s first undersea tunnel under Thane Creek. 🇮🇳 pic.twitter.com/g002aF2Oa5
नदीपूलदेखील पूर्णत्वाकडे
घणसोली ते शिळफाटा या ५ किमीच्या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले. प्रकल्पासाठी हा मैलाचा दगड असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. सध्या ३२० किमी वायडक्ट पूर्ण झाला असून, नदीपूलदेखील पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. साबरमती टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या काळात रखडलेले काम आता लवकर पूर्ण करण्याचे ध्येय आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ वाचणार असून, ठाणे, सुरत, वापी वडोदरा अशा शहरांची आर्थिक प्रगती साध्य होणार असल्याचे ते म्हणाले.