राज्यात सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट यासारख्या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील कुर्ल्यातील मिठी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने जवळच्या रहिवाशांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली.
मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली असून कुर्ला येथील क्रांती नगरमध्ये प्रवेश करू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून कुर्ल्यातील एमएम महानगरपालिका शाळेत आश्रय घेण्याची विनंती करण्यात आली, जिथे नागरिकांची खाण्या- पिण्याची व्यवस्था करण्यात आली, अशी घोषणा मुंबई पोलिसांकडून परिसरात वारंवार केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रांतीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू असून आतार्यंत ३५० जणांना सुखरूप शाळेत हलवण्यात आले.
"मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे ४.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत सरासरी १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. मिठी नदीची उंची ३.९ मीटर इतकी वाढली आहे. कुर्ला क्रांतीनगर येथून ३५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आढावा घेत असून महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत", असे सीएमओने एका पोस्टमध्ये म्हटले आहे.