२२ एप्रिल हा दिवस भारतीयांसाठी काळादिवस ठरला. या दिवशी पहलगामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय नागिरकांवर हल्ला करून २६ जणांची हत्या केली. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दहशतवादाविरुद्ध एक निर्णायक पाऊल उचलले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्यांना १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यातील तीन संशयितांचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही दहशतवाद आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध ठामपणे उभे आहोत. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांबाबत माहिती घेऊन पुढे येण्याचे आम्ही नागरिकांना आवाहन करतो. दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या आणि त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे."
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेतील दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे. संशयितांना पकडण्यासाठी जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन शिवसेनेने केले.