उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई, मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कार्यक्रर्त्यांनी केले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:06 IST2025-06-15T15:05:46+5:302025-06-15T15:06:48+5:30

अधिकृत कार्यक्रम करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगूनही विक्रोळीत शिंदे गटासह भाजप कार्यक्रर्त्यांनी उद्घाटन केले.

Mumbai: Flyover connecting Vikhroli East, West to open today | उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई, मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कार्यक्रर्त्यांनी केले उद्घाटन

उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई, मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कार्यक्रर्त्यांनी केले उद्घाटन

मुंबई: कोणताही अधिकृत कार्यक्रम न करता विक्रोळी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, शनिवारी या उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई जुंपल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे गटाने फीत कापून पुलाचे लोकार्पण केले. त्यानंतर काही वेळाने भाजपच्या वतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिंदेसेना, उद्धवसेना आणि भाजपकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली, तर आपल्या पाठपुराव्यामुळे पुलाचे बांधकाम मार्गी लागले, असा दावा महाविकास आघाडीचे खासदार संजय पाटील यांनी केला.

पावसाळ्यात अनेकदा लालबहादूर शास्त्री मार्गावर बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब विचारात घेता कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय मी, तसेच माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे आणि तसे आदेशसुद्धा दिले आहेत, अशी पोस्ट शुक्रवारी फडणवीस यांनी समाजमाध्यमावर टाकली होती. त्याचबरोबर शनिवारी पूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देशही त्यांनी पालिका आणि वाहतूक विभागाला दिले होते.

दुपारी चारनंतर पूल अधिकृतरीत्या केला खुला
माजी महापौर आणि शिंदे गटात प्रवेश केलेले दत्ता दळवी, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारीच उड्डाणपुलाकडे कूच केले. त्यानंतर दळवी यांच्या हस्ते फीत कापण्यात आली, तर १५ वर्षांपूर्वी खासदार संजय पाटील यांनी पुलाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांना प्रशासकीय यंत्रणेशी वारंवार पाठपुरावा करावा लागला होता. मात्र, उशिरा का होईना त्यांच्या मागणीला यश आले, असे निवेदन त्यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले. दरम्यान, दुपारी चार वाजता पालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूल अधिकृतरीत्या वाहतुकीसाठी खुला केला.

स्टंटबाजी केल्याची टीका 
विमान दुर्घटनेमुळे देशात दुखवटा असून, विक्रोळी पुलाचे उद्घाटन न करता सार्वजनिक वाहतुकीसाठी तो खुला करण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केली होती. मात्र, त्यांच्या विनंतीचा मान न ठेवता भाजपच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळी पुलाचे उद्घाटन ढोल, ताशाच्या गजरात केले. भाजपच्या कार्यकर्त्यांना विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे काहीही देणे-घेणे  नसून केवळ श्रेय लाटण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची स्टंटबाजी केल्याची टीका संजय पाटील यांनी केली.

Web Title: Mumbai: Flyover connecting Vikhroli East, West to open today