अहो आश्चर्यम्.... मुंबई झाले थंड हवेचे ठिकाण, पारा १३वर; महाबळेश्वरलाही टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 06:30 IST2024-12-10T06:29:52+5:302024-12-10T06:30:16+5:30
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीचा हा परिणाम असून, झोंबणारी ही थंडी मुंबईकरांना आणखी काही दिवस अनुभवायला मिळणार आहे.

अहो आश्चर्यम्.... मुंबई झाले थंड हवेचे ठिकाण, पारा १३वर; महाबळेश्वरलाही टाकले मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दमट हवा आणि सतत घामाच्या धारांना सरावलेल्या मुंबईकरांना थंडीचे मोठे अप्रूप. त्यामुळे हिवाळ्याची ते आवर्जून वाट पहात असतात. दिवाळीनंतर आलेल्या थंडीने या महानगरात बस्तान बसवले असे वाटत असतानाच पुन्हा गरमीने डोके वर काढले होते. मात्र, या गरमीवर मात करून आता पुन्हा थंडी परतली असून, मुंबईचा पारा चक्क १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीचा हा परिणाम असून, झोंबणारी ही थंडी मुंबईकरांना आणखी काही दिवस अनुभवायला मिळणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हिमालयीन पर्वत रांगांतून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी परत आली असून, राज्यातील अनेक शहरांच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. विशेष म्हणजे मुंबईचे तापमान १३, तर महाबळेश्वरचे १५ असून, वाढत्या थंडीमुळे मुंबईकरांना आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटता येत आहे.
२४ डिसेंबर २०१५ रोजी मुंबईचे किमान तापमान ११.४ होते. त्यानंतर ९ वर्षे डिसेंबरमध्ये पारा एवढ्या खाली घसरला नव्हता. यंदा मात्र डिसेंबरच्या सुरुवातीलाच पारा चक्क १३ अंशांपर्यंत खाली आला असून, ही नोंद १३.७ आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईकरांना गारेगार वातावरणाचा आनंद लुटता येईल.
- अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक