एमपीएससीमध्ये सी-सॅट'चे गुण मेरीटसाठी धरणार :विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 10:53 IST2019-07-09T10:49:25+5:302019-07-09T10:53:50+5:30
सी-सॅट मेरिटसाठी ठेवल्यास विज्ञान व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल.तर इतर शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.त्यामुळे या घोषणेचा पुनर्विचार करावा,अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

एमपीएससीमध्ये सी-सॅट'चे गुण मेरीटसाठी धरणार :विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण
राहुल शिंदे
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणा-या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक 2 (सी-सॅट) हा अर्हताकारी (क्वालिफाईंग ) स्वरुपाचा न ठेवता प्रचलित पध्दतीप्रमाणे पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांची गुणवत्ता (मेरिट)ठरविण्यासाठी ठेवण्यात यावा,अशी तज्ज्ञ समितीने केलेली शिफारस स्वीकारण्यात आली असल्याची घोषणा एमपीएससीने सोमवारी केली. मात्र,या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी मुख्य परीक्षेपर्यंत पोहचूच शकणार नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी)सर्व बाबी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्वीकारल्या जातात. एमपीएससीने सी- सॅट चा पेपर युपीएससी प्रमाणे केवळ क्वालिफाईंंनसाठी ठेवावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. त्यावर आयोगाकडून तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने राज्य सेवा (पूर्व) परीक्षेतील पेपर क्र. 2 हा क्वालिफाईंग स्वरुपाचा न ठेवता पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांची गुणवत्ता ठरविण्यासाठी ठेवण्यात यावा, अशी शिफारस केली.तसेच आयोगाने ही शिफासर मान्य केली. मात्र, एमपीएससीकडून युपीएससीच्या सर्व गोष्टींचे अनुकरण केले जाते. परंतु, युपीएससीप्रमाणे एमपीएससीकडून सी- सॅट पेपर क्वालिफाईंनसाठी का ठेवला जात नाही? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे सी-सॅट मेरिटसाठी ठेवल्यास विज्ञान व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल.तर इतर शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.त्यामुळे या घोषणेचा पुनर्विचार करावा,अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
द युनिक अॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव म्हणाले, विज्ञान शाखेची पार्श्वभूमी असणा-या विद्यार्थ्यांसाठी सी-सॅट फायदेशीर आहे.परंतु,ज्यांचा गणित व इंग्रजी विषय कच्चा आहे,अशा विद्यार्थ्यांना सी-सॅट आव्हानात्मक आहे.सुरूवातीला युपीएससीने सी-सॅट मेरिटसाठी ठेवला होता.परंतु,आता केवळ क्वालिफाईंगसाठी ठेवला आहे.सर्वसाधारणपणे युपीएससीप्रमाणे एमपीएससीसाठी सूत्र वापरले जाते.त्यामुळे एमपीएससीने सी-सॅट केवळ क्वालिफाईंसाठी ठेवला असला तर चांगले झाले असते.आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना तक्रार करण्यस वाव मिळणार आहे.
यासंदर्भात लोकमतने काही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.
एमपीएससीने सी-सॅट क्वालिफाईंसाठी ठेवावे यासाठी एमपीएससी स्टुडेंटस् राईटस्तर्फे आंदोलन करण्यात आले होते.त्यामुळेच तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने विद्यार्थ्यांच्या अडचणींचा खोलवर जाऊन विचार केल्याचे दिसून येत नाही.युपीएससीप्रमाणे एमपीएससीने सीसॅट क्वालिफाईंसाठी ठेवणे अपेक्षित होते. एमपीएससीने केलेल्या घोषणेमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.पुढील काही दिवसात याव ठोस भूमिका घेवून विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जाईल.
- महेश बढे,एमपीएससी स्टुडेंटस् राईटस्
विज्ञान व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना सी-सॅटचा पेपर सोपा जातो.या उलट ग्रामीण भागातून आलेल्या कला व इतर शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सी-सॅट मध्ये खूप कमी गुण मिळतात.त्यामुळे मुख्य परीक्षेपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक असणारे मेरिट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गाठताच येत नाही. एमपीएससीचा हा निर्णय बेरोजगारी वाढविणारा आहे. तसेच अनेक वर्षांपासून राज्य सेवेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरणारा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून या निर्णयाविरोधात तिव्रभावना व्यक्त केल्या जातील.
- विनायक शिंदे,विद्यार्थी उमेदवार
युपीएससीने सी-सॅट परीक्षा केवळ क्वालिफाईंगसाठी ठेवली होते.युपीएससी प्रमाणे एमपीएससीने सी-सॅट क्वालिफाईंगसाठीच करावी,अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.सध्या सेवेत असणारे अधिकारी सी-सॅटमध्ये अधिक गुण मिळवतात.परिणामी सेवेत असणारे विद्यार्थी पदोन्नती घेवून पुढे जातात.इतर विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेपर्यंत पोहचताच येत नाही.पहिल्या पेपरला अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी सी-सॅटमध्ये मागे पडतात.त्यामुळे शासनाने या घोषणेचा पुनर्विचार करावा.
- प्रकाश जाधव ,विद्यार्थी,एमपीएससी
ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आलेले विद्यार्थी गणित व इंग्रजी विषयात कमी पडतात.या उलट इंजिनिअरिंग व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना सी-सॅट मुळे मुख्य परीक्षेची संधी सहज उपलब्ध होते.त्यामुळे इतर शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो.सारथी संस्थेच्या प्रवेशासाठी केवळ पहिल्या पेपरचे गुण विचारात घेण्यात आले.तर दुस-या पेपरचे गुण केवळ क्वालिफाईंगसाठी होते.त्यामुळे शासनाच्या कार्यपध्दतीत गोंधळ असल्याचे दिसून येते.एमपीएससीने आपल्या घोषणेचा पुनर्विचार करावा.- आप्पा,हानतुरे,विद्यार्थी,एमपीएससी
युपीएससीप्रमाणे एमपीएससीने सी-सॅट केवळ क्वालिफाईंगसाठी ठेवावा,या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.त्यानंतर समितीची स्थापना करण्यात आली.मात्र,या समितीत सदस्य कोण होते.कोणत्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला,याबाबत एमपीएससीने गोपनियता ठेवली.मात्र,या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना तोटा होणार आहे.त्यामुळे एमपीएससीने या घोषणेचा पुनर्विचार करावा.
- किरण निंभोरे,एमपीएससी स्टुडेंटस् राईटस्