MPSC Results: राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 19:46 IST2021-09-28T19:46:01+5:302021-09-28T19:46:31+5:30
MPSC Results: साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल आला आहे. तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे.

MPSC Results: राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल
पुणे: सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी)आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून प्रसाद चौगुले यांनी प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे. रोहन कुवर यांनी मागासवर्गीय प्रवर्गातून तर मानसी पाटील यांनी मुलींमधून प्रथम कमांक पटकावला आहे.
एसईबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. आरक्षणाबाबत निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यापूर्वी घेतलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करू नये. तसेच नवीन पदांसाठी भरती करू नये,अशी भूमिका विविध स्तरावरून मांडण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने भरती प्रक्रियेबाबत अध्यादेश प्रसिध्द केला. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेली पदे खुल्या पदांमध्ये रुपांतरित करण्यात आली. त्यानुसार 420 पदांचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019- लिपिक टंकलेखक परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/MqtiKQRKMZ
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 28, 2021
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा 2019 चा अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी ‘ऑप्टिंग आऊट ’मागवले होते. त्यामुळे काही उमेदवारांनी स्वत:हून आपला समावेश या निकालात करू नये, असे आयोगाला कळवले होते.परिणामी सुधारित निकालामुळे कोणतीही नियुक्ती न मिळता बाहेर फेकल्या जाणा-या अनेक उमेदवारांचा फायदा झाला आहे. मात्र,पूर्वीच्या निकालात समावेश असणा-या काही उमेदवारांना सुधारित निकालाचा फटका बसला आहे.परंतु,या उमेदवारांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असल्याचे सुधारित निकालात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून सांगितले जात आहे.
ऑप्टिंग आऊट म्हणजे काय ?
राज्यसेवा 2019 च्या अंतिम निकालातून मिळणारे पद ज्या उमेदवारांना नको आहे, अशा उमेदवारांनी आपली नावे आयोगाला कळवावीत,असे आवाहन केले होते. त्यानुसार काही उमेदवरांनी आयोगाच्या आव्हाना प्रतिसाद दिला. परिणामी आरक्षण बदलामुळे बाहेर फेकल्या जाणा-या उमेदवरांना या पदांवर नियुक्ती देणे शक्य झाले.काही उमेदवार सध्या शासकीय सेवेत असून त्यांना पदोन्नती मिळाली आहे. राज्यसेवा 2019 च्या अंतिम निकालतून त्यांना कनिष्ठ स्तरावरील पद मिळाले असले.त्यामुळे आॅप्टिंग आऊटचा अनेकांना फायदा झाला.
राज्य शासनाच्या चालढकल धोरणामुळे सुमारे एक वर्ष उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही.त्यामुळे शासनाने अधिक विलंब न करता पुढील 15 दिवसात नियुक्तीपद द्यावे.
- महेश पांढरे, उत्तीर्ण उमेदवार