एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा रोहितकुमार राजपूत पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 06:35 IST2018-05-30T22:03:54+5:302018-05-31T06:35:23+5:30

सुधीर पाटील व सोपान टोपे यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे.

MPSC exam 2018 results announced | एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा रोहितकुमार राजपूत पहिला

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा रोहितकुमार राजपूत पहिला

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) सप्टेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत जळगावचा व सध्या पुण्यात राहत असलेला रोहितकुमार राजपूत पहिला आला. मागासवर्गीयांमधून सोलापूर जिल्ह्यातील अजयकुमार नष्टे तर मुलींमधून पुणे जिल्ह्यातील रोहिणी न-हे प्रथम आली. विद्यार्थ्यांना हा निकाल एमपीएससीच्या https://www.mpsc.gov.in या वेबसाइटवर पाहता येईल.  उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आदी ३७७ जागांसाठी परीक्षा झाली होती. १ लाख ९८ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ८३९ विद्यार्थी पात्र
ठरले. त्यातून मुलाखतीसाठी ११९४
उमेदवार निवडले गेले. रोहितकुमार ५९९ गुण मिळवून प्रथम तर कोल्हापूरचा सुधीर पाटील ५७२ गुणांसह दुसरा, सोपान टोम्पे ५७१ गुणांसह तिसरा, अजयकुमार नष्टे ५७० गुणांसह खुल्या गटातून चौथा तर मागासवर्गीयांमधून प्रथम, दत्तू शेवाळे ५६६ गुणांसह पाचवा आला आहे. प्रमोद कुडले, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, प्रसेनजीत प्रधान, रोहिणी नºहे, पूजा पाटील, पीयूष चिंचवडे, अमृता साबळे, नूतन खाडे आदी विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यसेवा परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांची निवड झाली नाही, त्यांना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास त्यांची गुणपत्रके प्रोफाइलमध्ये अपलोड झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावेत अशी सूचना आयोगाकडून करण्यात आली आहे.
 
स्पर्धा परीक्षा हे प्रचंड वैविधता असणारे क्षेत्र आहे. त्यातून समाजासाठी योगदान देता येते. त्यामुळे मी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सर्वसामान्य कुटुंंबात माझा जन्म झाला. माझे आई व वडील दोघेही फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. आई -वडिलांसह माझे मोठे बंधू व वहिनी यांचा मला पाठिंबा मिळाला.
- रोहितकुमार राजपूत

 

Web Title: MPSC exam 2018 results announced