छत्रपती शिवरायांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यास..., केंद्र सरकार कायदा आणणार, अमित शाह रायगडावरून घोषणा करणार

By संतोष कनमुसे | Updated: April 4, 2025 14:00 IST2025-04-04T13:49:20+5:302025-04-04T14:00:53+5:30

केंद्रीय मंत्री अमित शाह रायगडला भेट देणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

mp udayanraje bhosle demand succeeds there will be a law in the case of derogatory remarks about Shivaji maharaj Amit Shah will make an announcement | छत्रपती शिवरायांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यास..., केंद्र सरकार कायदा आणणार, अमित शाह रायगडावरून घोषणा करणार

छत्रपती शिवरायांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यास..., केंद्र सरकार कायदा आणणार, अमित शाह रायगडावरून घोषणा करणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याची प्रकरणे समोर आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यासह प्रशांत कोरटकर यानेही अपमानजनक वक्तव्य केले होते. या प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यावरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी कडक कायदा करण्याची मागणी केली होती.  दरम्यान, आता यावर कडक कायदा होणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. 

... तर मंगेशकर रुग्णालयावर कठोर कारवाई करणार; आरोग्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?

खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसापूर्वी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदे करण्याची मागणी केली होती.  या मागणीला आता यश आले आहे. या कायद्याची घोषणा स्वत: केंद्रीय मंत्री अमित शाह रायगडावरुन येऊन करणार असल्याची माहिती खासदार भोसले यांनी दिली.  

अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर खासदार भोसले यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला होता. दरम्यान, आज पत्रकारांसोबत संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, या महिन्यात १२ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून घोषणा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात मी जी इच्छा व्यक्त केली होती, त्या कायद्याची घोषणा झाली तर याला वेगळे महत्व प्राप्त होईल, असंही उदयनराजे भोसले म्हणाले. 

प्रशांत कोरटकरचा जामिनासाठी अर्ज

 महापुरुषांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणे, या प्रकरणातील नागपुरातील आरोपी प्रशांत कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांनी गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अपील अर्ज केला. यावर उद्या, शनिवारी किंवा सोमवारी दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.



चौथे सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी मंगळवारी कोरटकर याचा जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे कोरटकर याचा मुक्काम कळंबा कारागृहात वाढला आहे. नवीन अर्जावर सरकारी वकील, पोलिस विभागातील तपास अधिकारी, फिर्यादी इंद्रजित सावंत यांचे म्हणणे घेतले जाणार आहे. त्यानंतर जामीनवर निर्णय होणार आहे.

 

Web Title: mp udayanraje bhosle demand succeeds there will be a law in the case of derogatory remarks about Shivaji maharaj Amit Shah will make an announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.