BJP Ashok Chavan News: जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. काही गैर नाही. काँग्रेसने मागणी केली होती, आणखी कुणी मागणी केली होती. मागणी कुणीही करू दे. ज्यांनी निर्णय घेतला, त्यांनाच याचे श्रेय जाते. देशाच्या पंतप्रधानांनी जातनिहाय जनगणनेचा अचूक निर्णय घेतला आणि याचे श्रेय केवळ त्यांनाच जाते. संभ्रम यातून दूर होतील. विशेषतः आरक्षणाचा जो मुद्दा आहे, तो यातून अधिक सोपा होईल, असा विश्वास भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
एका सभेला संबोधित करताना अशोक चव्हाण बोलत होते. मी भाजपामध्ये आल्यानंतर जिल्ह्यातील ७० ते ८० टक्के कार्यकर्ता माझ्याबरोबर आला. तो कार्यकर्ता १०० टक्के काम करेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. काँग्रेसमधून आलेले कार्यकर्ते आणि भाजपाची जुनी टीम यांचा संगम झालेला आहे. त्यामध्ये जवळचा-लांबचा, जुना-नवीन हा विषयच राहिलेला नाही. जो काम करेल आणि जो रिझल्ट देईल, तो पुढे जाईल, ही आपली भूमिका आहे, असेही अशोक चव्हाण यांनी नमूद केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या नेतृत्वात राज्याची आणि देशाची जी आगेकूच सुरू आहे, त्याची गती आगामी काळात आणखी वाढली पाहिजे. आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे की, आगामी काळात येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा झेंडा वरच्या क्रमांकावर लागला पाहिजे. सामूहिक पद्धतीने जोर लावून आपल्याला पुढे जायचे आहे. विरोधकांमध्ये कोण काय बोलते, याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मला त्याची काही पडलेली नाही. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत बसायला माझ्याकडे वेळ नाही, असा खोचक टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.
दरम्यान, २६/११ ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला अजूनही विस्मृतीत गेलेला नाही. त्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे लोकांच्या जखमा उफाळून आलेल्या आहेत. पहलगाम हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना फासावर चढवले पाहिजे, हीच भूमिका सर्वसामान्य नागरिकांची आहे. हा हिंदू-मुस्लिमचा विषयच नाही. पंतप्रधानांना सर्वांनीच पाठिंबा दिला आहे. पंतप्रधानांनी केलेली कारवाई देशातील तमाम जनतेला मान्य आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.