नाशिकमध्ये आईने मुला-मुलीसह संपविली जीवनयात्रा :ह्रदयद्रावक
By Admin | Updated: June 25, 2017 19:27 IST2017-06-25T19:27:47+5:302017-06-25T19:27:47+5:30
येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील ठाणापाडा गावात आईने आपल्या मुला व मुलीसह स्वत:चे आयुष्य संपविल्याची ह्रदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

नाशिकमध्ये आईने मुला-मुलीसह संपविली जीवनयात्रा :ह्रदयद्रावक
आॅनलाइन लोकमत, नाशिक : येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील ठाणापाडा गावात आईने आपल्या मुला व मुलीसह स्वत:चे आयुष्य संपविल्याची ह्रदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेल्या पतीनेदेखील दोन महिन्यांपुर्वी आत्महत्त्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. आत्महत्त्या की घातपात या बाबत पोलीस तपास करीत आहेत. या घटनेने संपुर्ण ठाणापाडा हरसूल गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरसूल गावामध्ये राहणाऱ्या हौसाबाई गिरीधर लोखंडे (३५) यांनी राहत्या घरी मुलगा नीरज (१४), माधुरी (११) यांच्यासह आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले आहे. सहा महिन्यांपुर्वी पती गिरीधर लोखंडे यांनी आत्महत्त्या केल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत बुडालेल्या हौसाबाईने स्वत:सह मुलांचेही आयुष्य संपविल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रात्री आपल्या मुळाबाळांसह हौसाबाई यांनी जेवण करून घराचा दरवाजा बंद केला तो कायमस्वरुपीच. दिवस उजाडल्यानंतरही हौसाबाई यांचे दार उघडले नाही म्हणून परिसरातील नागरिकांना संशय आला त्यांनी त्यांच्या भावाला याबाबत माहिती दिली. भावाने बहिणीच्या दारावर येऊन खिडकीतून डोकावले असता, बहिण व भाच्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले आणि त्याच्या पायाखालून जमीन घसरली. लोकांनी धीर दिला आणि सदर घटनेची माहिती सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हरसूल पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने ठाणापाडा गाठले आणि राहत्या कौलारू घराच्या वास्यांना लटकलेले मृतदेह खाली काढले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात संध्याकाळी आणले. मुलगा नीरज पाचवीमध्ये तर मुलगी माधुरी ही सातवीमध्ये शिक्षण घेत होती. शेतमजुरी करून लोखंडे कुटुंबिय उदरनिर्वाह करीत होते.