मुलांना जाळून आईने स्वत:लाही पेटवले, तिघांचाही मृत्यू; कल्याणच्या वाडेघरमधील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:25 IST2017-09-11T05:24:14+5:302017-09-11T05:25:36+5:30

जन्मदात्या आईनेच दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून ठार मारत नंतर स्वत:ही अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात तिचाही मृत्यू झाला. ही घटना कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील नाईक चाळीत शनिवारी घडली आहे.

Mother burns her children and burns herself, death of three; Events in Kalyan's Wadaher | मुलांना जाळून आईने स्वत:लाही पेटवले, तिघांचाही मृत्यू; कल्याणच्या वाडेघरमधील घटना  

मुलांना जाळून आईने स्वत:लाही पेटवले, तिघांचाही मृत्यू; कल्याणच्या वाडेघरमधील घटना  

कल्याण : जन्मदात्या आईनेच दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून ठार मारत नंतर स्वत:ही अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात तिचाही मृत्यू झाला. ही घटना कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील नाईक चाळीत शनिवारी घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अनिता कनोजिया (२९) असे आईचे तर नंदिनी (२) आणि दुर्गेश (९ महिने) अशी मुलांची नावे आहेत. अनिताचे पती अजयकुमार लॉण्ड्रीत कामाला आहेत. शनिवारी सकाळी ते कामावर गेले. त्यानंतर दुपारी घरी जेवून ते पुन्हा कामाला गेले. सायंकाळी त्यांच्या शेजारणीने त्यांच्या घराचे दार ठोठावले. तेव्हा दाराला आतून कडी होती. अनिता आतून कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे शेजारणीला संशय आला. तिने अजयकुमार यांना फोनद्वारे हा प्रकार सांगताच ते तातडीने घरी आले. दार उघडण्याचा त्यांनीही प्रयत्न केला. खोलीच्या मागील खिडकीतून त्यांनी पाहिले असताना अनिता व दोन मुले जळलेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांना पाचारण केल्यानंतर त्यांनी दार उघडून तिन्ही मृतदेहांचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवले आहेत.
मुलांवर रॉकेल ओतून त्यांना जाळल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मृत अनिताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अजयकुमार हा आर्थिक विवंचनेत होता. त्यामुळे तिने मुलांना जाळून स्वत:ही आत्महत्या केली असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

आत्महत्येमागील कारण शोधण्याची पतीची मागणी

मृत अनिताचा पती अजयकुमार याने सांगितले की, त्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक विवंचना नव्हती. तसेच त्यांचा संसार सुखी होता. पत्नी व मुलेही त्यांच्या कामाविषयी समाधानी होते. त्यामुळे पत्नीने मुलांना का जाळले, तसेच तिने का आत्महत्या केली, या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून खऱ्या कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी अजयकुमार यांनी केली आहे.

Web Title: Mother burns her children and burns herself, death of three; Events in Kalyan's Wadaher