स्थानिकांच्या आग्रहामुळेच मोरिवलीचा ‘मृत्यूचा शॉर्टकट’ खुला; रेल्वे करणार होती मार्ग बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 10:51 IST2025-07-24T10:50:36+5:302025-07-24T10:51:09+5:30
अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील मोरिवली गावानजिक अपघाताच्या धोक्यामुळे रेल्वे क्रॉसिंगचा शॉर्टकट बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र, ग्रामस्थांनी त्याला विरोध केला.

स्थानिकांच्या आग्रहामुळेच मोरिवलीचा ‘मृत्यूचा शॉर्टकट’ खुला; रेल्वे करणार होती मार्ग बंद!
अंबरनाथ :अंबरनाथरेल्वे स्थानकाजवळील मोरिवली गावानजिक अपघाताच्या धोक्यामुळे रेल्वे क्रॉसिंगचा शॉर्टकट बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र, ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्याने याठिकाणी एक लहानसा मार्ग पादचाऱ्यांसाठी ठेवण्यात आला. दररोज शेकडो रेल्वे प्रवासी त्याचा वापर करतात आणि तोच मार्ग जीवघेणा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी याच ठिकाणी वैशाली धोत्रे व आतिष आंबेकर यांचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला होता.
अंबरनाथच्या बुवापाडा, मोरिवली गाव, भेंडीपाडा या परिसरातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने एमआयडीसी परिसरात कामानिमित्त जातात. कामावरून सुटल्यानंतर अनेक कामगार पायी रेल्वे क्रॉसिंग करून अंबरनाथ पूर्वेकडून पश्चिमेकडील मोरिवली गावात जातात. वर्षभरापूर्वी रेल्वे प्रशासनाने आरसीसी भिंत बांधून रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या कामाला स्थानिकांनी विरोध करत शॉर्टकट तसाच ठेवण्याची मागणी केली. मात्र, आता हाच मार्ग जीवघेणा ठरला आहे. ज्याठिकाणी हा अपघात झाला, त्याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडे हा प्रकल्प रखडला आहे.
पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी मोरिवली गावाजवळ उड्डाणपूल किंवा पादचारी पूल होणे गरजेचे आहे. कामगारांसाठी हा मार्ग सोयीचा आहे.
- नंदकुमार भागवत, स्थानिक रहिवासी
नको त्या ठिकाणी उभारण्यात आला उड्डाणपूल
अंबरनाथ शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी नव्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव मोरिवली गावाजवळ ठेवण्यात आला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने शहराच्या सोयीनुसार उड्डाणपूल न बनवता रेल्वे फाटक बंद करण्याच्या दृष्टीने आवश्यकता नसलेल्या ठिकाणी कानसई सेक्शन परिसरात उड्डाणपूल उभारला. ते काम आता रखडलेले आहे. ज्याठिकाणी गरज आहे, त्याठिकाणी उड्डाणपूल न उभारता, नको त्या ठिकाणी उभारल्यामुळे नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालावा लागत आहे.