मान्सून आला उंबरठ्यावर!
By Admin | Updated: June 10, 2016 04:57 IST2016-06-10T04:57:43+5:302016-06-10T04:57:43+5:30
मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने येत्या ४८ तासांत तो कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल,

मान्सून आला उंबरठ्यावर!
पुणे : मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने येत्या ४८ तासांत तो कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनची वेगाने आगेकूच होत असून गुरुवारी तो कर्नाटक, तमिळनाडूत हजेरी लावली.
मान्सून केरळमध्ये थोडा उशिरा ८ जूनला दाखल झाल्यानंतर त्याला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती कायम आहे. गुरुवारी आगेकूच करीत मान्सूनने केरळ व तामिळनाडू राज्यांचा उर्वरित भाग, कर्नाटक राज्याची किनारपट्टी व इतर भाग, रायलसीमा व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी, बंगालच्या उपसागराचा मध्य भाग, आरबी समुद्राच्या मध्य भाग व्यापला. पुढील २ दिवसांत तो गोवा आणि कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल, असे सध्याचे चित्र आहे.
गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मालवण येथे सर्वाधिक १०० मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ खेड, कुडाळ येथे ८०, पेडणे येथे ७०, श्रीवर्धन येथे ६०, कणकवली, संगमेश्वर, देवरूख, सावंतवाडी येथे ५०, महाड, तळा येथे ४०, रोहा, सांगे येथे ३०, देवगड, मुरूड, पोलादपूर, वेंगुर्ला येथे २० तर माणगाव, रत्नागिरी, वैभववाडी येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाची संततधार सुरू असल्याने कोकणवासीय सध्या ‘पाऊस इलो, पाऊस इलो’ असा जयघोष करीत चिंब होण्याचा आनंद लुटत आहेत. मुंबईसह उर्वरित राज्यातील नागरिक मात्र मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांच्या तोंडावर पाऊस कधी येणार, याचीच चिंता दाटून राहिली आहे. (प्रतिनिधी)