राज्यात मान्सूनचे आगमन २४ जूनला; हवामान खात्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 06:17 IST2019-06-18T04:35:26+5:302019-06-18T06:17:31+5:30
मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस

राज्यात मान्सूनचे आगमन २४ जूनला; हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असल्याने, मंगळुरू येथे स्थिरावलेले नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय झाला असून, पुढील चार ते पाच दिवसांत म्हणजेच २४ ते २५ जूनला मान्सूनचे राज्यात आगमन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
१ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित असताना मोसमी वारे एक आठवडा उशिराने पोहोचले. मात्र, मध्येच धडकलेल्या ‘वायू’ या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या मार्गात अडथळा निर्माण केला. सध्या मान्सून कर्नाटकातील मंगळुरूमध्ये स्थिरावला आहे, तर चक्रीवादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे.
दरम्यान, पुढील ४ ते ५ दिवसांत मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता असून, तो कर्नाटकासह, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, दक्षिण कोकणातील काही भाग, गोवा या ठिकाणी येण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे़ येत्या २४ ते २५ जूनला मान्सूनचे राज्यात आगमन होण्याची शक्यता आहे.
उद्या कोकण, गोव्यात मुसळधार
१९ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असेल़ विदर्भात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़ २० व २१ जून रोजी विदर्भात उष्णतेची लाट असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘वायू’ चक्रीवादळाचा तीव्रता कमी झाली असून, त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाले आहे़ ते मध्यरात्री ते उत्तर गुजरातला धडक देण्याची शक्यता आहे़