दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 06:58 IST2025-10-03T06:57:07+5:302025-10-03T06:58:14+5:30
केंद्राकडे करणार अतिरिक्त मदतीची मागणी

दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
ठाणे/मुरबाड : पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीच्या आत पैसे जमा करू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. तर, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मुरबाड माळशेज रेल्वेमार्ग मार्गी लावण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांना दिल्लीला सोबत नेऊन रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पवार यांनी मुरबाड येथील एका कार्यक्रमात दिली. पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला हे ठाण्यात उपस्थित होते.
चार वर्षे निवडणुका न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची संधी हुकली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याप्रमाणे ३१ जानेवारी २०२६च्या आत जिल्हा पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. ५ ऑक्टोबरला देशाचे गृहमंत्री अमित शहा राज्यात येत आहेत. तेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना भेटतील व या संकटातून बळीराजाला सावरण्याकरिता मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी स्वराज संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर अजित पवार यांच्या हस्ते मुरबाडमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर माउली गार्डन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. प्रतीक हिंदूराव यांनी मुरबाडमधील बंद पडलेल्या कारखान्यामुळे सुशिक्षित तरुणांपुढे रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे, तसेच मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज व नाट्यगृह उभारण्यात यावे, अशी मागणी केली.
स्वतःच्या फायद्यासाठी ठेकेदारी करू नका
कार्यकर्त्यांना ठेकेदारीतून कामे करा; परंतु त्याचा सर्वसामान्य जनतेला फायदा झाला पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी ठेकेदारी करू नका, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. प्रवक्ते आनंद परांजपे, आ. दौलत दरोडा, जगन्नाथ शिंदे, भरत गोंधळी, चंद्रकांत बोस्टे आदींची यावेळी उपस्थिती होती.