बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
By यदू जोशी | Updated: November 9, 2025 07:27 IST2025-11-09T07:25:43+5:302025-11-09T07:27:23+5:30
Election Commission News: दारूविक्रीत कोणत्या दुकानांत अचानक वाढ झाली आणि ती का झाली, तेथून मतदारांसाठी दारूचा पुरवठा केला जात आहे का?, बँका आणि पतपेढ्यांमधून पैसा मोठ्या प्रमाणात अचानक काढला जात आहे का यावर राज्य निवडणूक आयोगाची करडी नजर असेल.

बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
- यदु जोशी
मुंबई - दारूविक्रीत कोणत्या दुकानांत अचानक वाढ झाली आणि ती का झाली, तेथून मतदारांसाठी दारूचा पुरवठा केला जात आहे का?, बँका आणि पतपेढ्यांमधून पैसा मोठ्या प्रमाणात अचानक काढला जात आहे का यावर राज्य निवडणूक आयोगाची करडी नजर असेल. पैसा इकडून तिकडे मोठ्या प्रमाणात पोहोचविणारे हवालावालेही आयोगाच्या रडारवर असतील, अशी माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था पार्श्वभूमीवर, निवडणुकीच्या निवडणुकांतील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत; मात्र तेवढ्यावरच न थांबता त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात पोलिस, उत्पादन शुल्क आणि अन्य संबंधित विभागांनी कोणतीही कुचराई केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही आयोगाने बजावले आहे.
दारू दुकानांमध्ये दारूची विक्री निवडणूक काळात तिप्पट, चारपट वाढली असेल तर अशा दुकानांची चौकशी केली जाईल आणि विक्रीमध्ये इतकी वाढ कशी झाली, नवीन ग्राहक कोणते एकाचवेळी एका व्यक्तीने मोठ्या प्रमाणात दारू खरेदी केली आहे का याचा तपशील दुकानदारांकडून घेतला जाणार आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी दारू खरेदी केल्याचे लक्षात येताच संबंधित कार्यकर्त्याकडे चौकशी करून कारवाई देखील केली जाणार आहे.
राजकीय नेत्यांच्या पतसंस्थांवर विशेष लक्ष
ज्या बँका, पतसंस्थांमधून भरपूर पैसा निवडणूक काळात काढणे सुरू झाले आहे त्यांना त्याबाबतचा जाब विचारला जाणार आहे. पोलिस, गुप्तचर आणि अन्य यंत्रणांच्या माध्यमातून बँका, पतसंस्थांच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवली जाणार आहे.
राजकीय नेत्यांच्या पतसंस्था २ विशेषतः रडारवर असतील. कोणत्या व्यक्तीच्या वा संस्थेच्या खात्यातून रकमा दरदिवशी वा सातत्याने काढल्या जात आहेत आणि त्याचा संबंध निवडणुकीशी आहे का याची माहितीही घेतली जाणार आहे.
हवाला रॅकेटवर राहणार पथकांची करडी नजर
हवालाद्वारे लाखो-कोट्यवधी रुपये एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचविले जातात. या व्यवसायात असलेल्यांवरही नजर असेल आणि ते राजकीय पक्ष, राजकीय नेत्यांचा पैसा कुठे पोहोचवत आहेत का याची माहिती दरदिवशी घेतली जाणार आहे.
महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यांपैकी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगडमधून लपवून पैसा आणला जात असेल तर बारीक नजर ठेवण्यासाठी चेकपोस्ट, भरारी पथके सक्रिय असतील.