मोहाच्या दारूची अस्वलांनाही नशा
By Admin | Updated: December 22, 2016 17:31 IST2016-12-22T17:31:21+5:302016-12-22T17:31:21+5:30
ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्यात असलेल्या गावालगतच्या जंगलात मोहाच्या झाडांच्या फुलांपासून गावठी दारू बनविण्यात येते

मोहाच्या दारूची अस्वलांनाही नशा
विवेक चांदूरकर/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 22 - ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्यात असलेल्या गावालगतच्या जंगलात मोहाच्या झाडांच्या फुलांपासून गावठी दारू बनविण्यात येते. ही मोहाची फुले खाण्याकरिता अस्वल गावामध्ये येत असून, यातूनच हल्ले होत असल्याची
शक्यता बीअर एक्स्पर्ट समितीच्या संशोधकांनी वर्तविली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्य आहे. या दोन्ही अभयारण्यात अस्वलांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या अभयारण्यात अनेक गावेही आहेत.
या गावातील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून अभयारण्यात शेती करीत आहेत. मात्र, गत काही महिन्यांमध्ये अस्वलांचे हल्ले वाढले असून, चार महिन्यात चार जणांचा मृत्यू झाला तर दहा ते बारा जण जखमी झाले. डोंगर खंडाळा व डोंगर शेवली या गावांमध्ये अस्वलाने हल्ले करून तिघांना ठार केले. यासोबतच मोताळा तालुक्यात शेतांमध्ये अस्वलाचा वावर वाढला होता. पिलासह असलेल्या या अस्वलामुळे शेतकरी भयभीत झाले होते. याच भागात शेतातील झाडावर पाय अडकलेल्या अस्वलाला वनविभागाने ताब्यात घेवून जंगलात सोडले. जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून अस्वल व शेतकरी वास्तव्य करीत आहेत. आतापर्यंत अस्वलांच्या हल्ल्यांच्या घटना घटना घडल्या नाहीत. मात्र, अचानकच अस्वलांचे हल्ले का वाढले, याचा शोध घेण्यासाठी अस्वलांवर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीला पाचारण करण्यात आले आहे. या समितीने अभयारण्याची व हल्ले झालेल्या ठिकाणाची पाहणी केली.
गावांमध्ये काही नागरिक मोहाच्या फुलांपासून दारू बनवितात. तसेच गावालगतच्या शेतांमध्ये, झुडूपांमध्ये दारू बनविण्यात येते. यामध्ये वापरण्यात येणारे मोह हे अस्वलाचे प्रमुख खाद्य आहे. अस्वलाला दूरवरून या मोहाच्या फुलांचा गंध येतो. त्यामुळे अस्वल या मोहाच्या फुलाकडे आकर्षित होते व त्या ठिकाणाकडे धाव घेते. सदर दारूच्या भट्या या गावालगत असल्यामुळे अस्वली गावाकडे वळल्या असल्याचे मत बीअर एक्स्पर्ट कमिटी नवी दिल्लीचे सहसंचालक डॉ. निशीथ धारिया यांनी व्यक्त केले आहे. अस्वल हा मुळ आक्रमक प्रवृत्तीचा प्राणी असून, प्रजनानाच्या काळात किंवा पिल्लांसह असलेली मादी अस्वल अधिकच आक्रमक असते. त्यामुळे मोहाच्या गंधाने गावाच्या वेशीत आलेल्या अस्वलाला माणूस निदर्शनास पडल्यावर हल्ला करीत असल्याचीही शक्यता असल्याचे मत डॉ. धारिया यांनी व्यक्त केले आहे.
वनविभागाने केली तक्रारी
अभयारण्यात असलेल्या गावांमध्ये तसेच गावालगतच्या भागात अनेक ठिकाणी दारूच्या भट्या असून, या भट्यांकडे अस्वल आकर्षित होते व परिणामी हल्ले वाढत असल्याची तक्रार वनविभागाने पोलिस विभागाकडे केली आहे.
गावातील काही नागरिक दारू बनविण्याकरिता मोहाच्या फुलांचा वापर करीत आहेत. ही फुले अस्वलाचे मुख्य खाद्य आहे. या फुलांच्या गंधाने अस्वल गावाकडे वळते. यादरम्यान माणूस व अस्वलाचा सामना झाला तर हल्ले होण्याची
शक्यता आहे.
- डॉ. निशीथ धारिया
सहसंचालक, बीअर एक्स्पर्ट कमिटी नवी दिल्ली.