महाराष्ट्र दावणीला बांधण्याचा मोदींचा डाव!
By Admin | Updated: October 8, 2014 03:52 IST2014-10-08T03:52:30+5:302014-10-08T03:52:30+5:30
त्यांच्या भुलथापांना महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नसल्याचे चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)

महाराष्ट्र दावणीला बांधण्याचा मोदींचा डाव!
अंबाजोगाई (जि़ बीड) : गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली व दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्रात भाजपाकडे नेतृत्वाचा मोठा अभाव निर्माण झाला. परिणामी शिल्लक असलेल्या शहरी संस्कृतीच्या लोकांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय न राहिल्याने त्यांच्या गावोगावी जाहीर सभा घेतल्या जात आहेत. महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला नेऊन बांधण्याचा नरेंद्र मोदी यांचा कुटील डाव आहे, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला.
चव्हाण म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी मोदींचा आटापिटा सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता हा दुजाभाव ओळखून आहे. मुंबईतील उद्योगपतींना गुजरातमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी बोलावले जात आहे. मुंबईत उद्योग व्यवसायाचे असणारे वर्चस्व मोडीत काढण्याचा मोदींचा डाव आहे. मंगल यानचा निर्णय काँग्रेसचा होता. मात्र, याचे श्रेय मोदी लाटतात. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेला भुलथापा देऊन मते मिळवणे, अच्छे दिन आनेवाले है, असे आश्वासन हवेत विरले. कसल्याही विकासाचा आराखडा अद्यापही जनतेपर्यंत पोहचला नाही. महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय करण्याचेच काम मोदी यांनी केले आहे. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातमध्ये पळवायचे व गुजरातचा विकास साध्य करायचा ही कूटनीति त्यांनी आखली आहे. महाराष्ट्रातील पालघरचा प्रकल्प मोदींनी द्वारकेला पळवला. ही त्यांची चालाखी आता महाराष्ट्राने ओळखली आहे. त्यांच्या भुलथापांना महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नसल्याचे चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)