मोदींनी देशातील पर्यटन विकासाची सुरुवात औरंगाबादेतून करावी : जलील
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 18:14 IST2019-06-26T18:13:43+5:302019-06-26T18:14:55+5:30
कधीकाळी औरंगाबादहून उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा सुरू होती. या सेवेचा पर्यटक मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने किमान दोन एअरलाईन दिल्ली आणि मुंबईसाठी सुरू कराव्या, अशी मागणी जलील यांनी केली.

मोदींनी देशातील पर्यटन विकासाची सुरुवात औरंगाबादेतून करावी : जलील
नवी दिल्ली - औरंगाबादचे ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थान पाहता औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेच्या पहिल्या आधिवेशनात औरंगाबादच्या पर्यटन आणि उद्योगवाढीसाठी आपण काम करणार असल्याचे स्पष्ट केले. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ येथील लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात, मात्र विमानसेवा ठप्प झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला असून त्यामुळेच येथील उद्योग क्षेत्र देखील डबघाईला आल्याचे जलील यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देशातील पर्यटन विकासाला औरंगाबादेतून सुरुवात करावी, अशी विनंती जलील यांनी केली.
अजिंठा आणि वेरुळ या पर्यटन स्थळांमुळे औरंगाबादला जागतिक वारसा लाभला असून जगभरातील पर्यटक येथे येतात. मात्र जेटएअरवेज ही विमानसेवा कंपनी बंद पडली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम औरंगाबादच्या पर्यटनावर झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. तर औरंगाबादमध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. एअरलाईन बंद पडल्यामुळे अनेक उद्योग बंद पडली असून अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे एक एअरलाईन सुरू करण्यासाठी आम्ही संबंधित मंत्रालयात गेलो होतो. परंतु, जेट एअरवेजचे सर्व पाटलट दुसऱ्या कंपन्यांमध्ये शिफ्ट झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अडचण पायलटची नसून विमानसेवा ठप्प झाल्यामुळे पर्यटन इंडस्ट्री ढासळली आहे. याचा परिणाम उद्योगांवर झाल्याचे जलील यांनी नमूद केले.
कधीकाळी औरंगाबादहून उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा सुरू होती. या सेवेचा पर्यटक मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने किमान दोन एअरलाईन दिल्ली आणि मुंबईसाठी सुरू कराव्या, अशी मागणी जलील यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात पर्यटनावर भर देणार असल्याचे म्हटले आहे, याची आठवण करून देताना त्याची सुरुवात औरंगाबादेतून करावी, असंही जलील यांनी म्हटलं आहे.