संजय मानेपिंपरी : साठ लाखाच्या खंडणीसाठी पूर्णानगर येथून अपहरण करून नेलेल्या सात वर्षाच्या ओम संदीप खरात या मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. त्याच्या सुटकेसाठी पोलिसांनी प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकले. अपहरणाचे वृत्त देऊ नका, ओमच्या जीवाला धोका पोहोचू शकेल,अशी विनंती पोलिसांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना केली. ब्रेकिंग न्यूजची स्पर्धा असतानाही पोलिसांना तपासात अडचणी येऊ नयेत,यासाठी प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधींनी यांनी वृत्त प्रसारित न करता पोलिसांना सहकार्य केले. मोबाईलधारकांनी मात्र आततायीपणा दाखविला. अशा वेळी सोशलमिडियावर माहिती टाकणाºयांनी भान जपावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जातीय दंगल, प्रक्षोभक वक्तव्य, जातीय तेढ निर्माण होईल, सामाजिक सलोख्याला बाधा पाहोचेल अशा घटना घडल्या तरी पत्रकार सामाजिक भान जपतात. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना अपेक्षित सहकार्य करण्याची भूमिका प्रसारमाध्यमांकडून घेतली जाते. भडक वृत्त देण्याचे टाळले जाते. याचा वेळोवेळी प्रत्यय येतोच,परंतू अलिकडच्या काळात सोशल मिडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. एखादी घटना काही क्षणात अत्यंत वेगाने व्हॉटसअॅप, फेसबुक,व्टिटरवर व्हायरल होते. कोणताही विचार न करता, एका ग्रुपवरून सहज दुसºया ग्रुपवर माहिती प्रसारित केली जाते. असाच प्रकार ओम खरात या अपहरण झालेल्या मुलाच्या बाबतीत घडला. रोज पोलिसांच्या संपर्कात असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिंधीना सात वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली होती. त्याच्या सुटकेसाठी पोलीस पथके कार्यरत असल्याने पोलिसांच्या पुढील सूचना येईपर्यंत वृत्त न देण्याचा संयम त्यांनी बाळगला. त्यातूनही व्हॉटसअॅपच्या काही ग्रुपवर ओमचे अपहरण झाल्याची माहिती टाकली जात होती. ही माहिती कोणीही व्हॉटसअॅपवर प्रसारित करू नये, असे विविध ग्रुपवर आवाहन केले जात होते. तरिही बेभान मोबाईलधारक ही माहिती बेपर्वाईने सोशल मिडियावर टाकत होते. सुदैवाने ओमची अपहरकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात पोलिसांना यश आले. ही त्याच्या कुटंूबियांसह सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र यापुढे तरी सोशल मिडियावर भान जपले जावे. अशी अपेक्षा व्यकत होत आहे.
सोशल मिडियामुळे अंध दांपत्य त्रस्त-
लालटोपीनगर, पिंपरी येथे राहणाºया लोखंडे या अंध दांपत्याचे मुलीसह कोणीतरी मोबाईलवर छायाचित्र काढले. छायाचित्रातील मुलगी त्यांची नसून भिक मागण्यासाठी त्या मुलीचा आधार घेतला जात आहे. असा मजकूर व्हॉटसअॅपवर महिन्यापुर्वी प्रसारित झाला. तेव्हापासून अद्यापपर्यंत लोखंडे दांपत्य त्रस्त आहे.