महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:35 IST2025-11-04T12:34:09+5:302025-11-04T12:35:21+5:30
Maharashtra Local Body Election Date: राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद बोलाविली आहे. दुपारी ४ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
मतदार यादीतील दुबार नोंदीमुळे विरोधी पक्षांनी त्या दुरुस्त करून निवडणूक घेण्याची मागणी केलेली असताना आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये राज्यात जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगर पालिकांसह महानगरपालिकांची निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद बोलाविली आहे. दुपारी ४ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाण्याची शक्यता असून यानंतर लगेचच महाराष्ट्रात आचारसंहिता लागणार आहे. या काळात कोणतीही लोकप्रिय घोषणा, विकासकामे केली जाणार नाहीत.
सुमारे दीड-दोन महिने ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या निवडणुका दोन-तीन टप्प्यांत देखील घेतल्या जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीला नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतील, यानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लागतील व त्यानंतर महानगर पालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यामध्ये बदल देखील होऊ शकतो. 
 
डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन...
डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे. यामुळे त्यानंतरच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होईल. तसेच जानेवारीत महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर पहिल्या टप्प्यातील निवडणुका या नोव्हेंबरमध्येच पार पडण्याची शक्यता आहे. या काळात संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता कमी असून ज्या भागात निवडणूक नाही तिथे आचारसंहित शिथील केली जाण्याची शक्यता आहे.