मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 08:38 IST2025-07-26T08:38:36+5:302025-07-26T08:38:51+5:30
केंद्रीय समितीच्या अहवालानंतर राज ठाकरेंचा निर्णय

मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्लॅन ए, बी, सी तयार करण्यात येत आहे. युती होवो अथवा न होवो निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे. तसेच, केंद्रीय समितीच्या अहवालावर चर्चा करून पक्षातील रिक्त पदांवर तरुणांना संधी देण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती मनसे सूत्रांनी दिली.
राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी महत्त्वाचे नेते, केंद्रीय समिती, मुंबई शहर अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष यांची आढावा बैठक घेतली. केंद्रीय समितीने मुंबईतील विभागनिहाय अहवाल तयार केला असून यात पक्षाची सद्यस्थिती व रिक्त पदांची माहिती देण्यात आली आहे. या अहवालावर विचारमंथन करून राज यांनी सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली.
शिवतीर्थ येथील बैठकीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांची दुसरी बैठक कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या जुन्या निवासस्थानी झाली. संघटनात्मक प्रश्न मार्गी लावणे. युती, आघाडीवर अवलंबून न बसता मुंबईतील सर्व जागांसाठी चाचपणी सुरू करणे. युती, आघाडी झाल्यास अथवा न झाल्यास, शिंदेसेना किंवा उद्धवसेनेसोबत युती केल्यास व स्वबळावर निवडणूक लढल्यास त्याचे पक्षावर काय परिणाम होतील, या प्रमुख तीन मुद्द्यांवर विचार विनिमय झाला, असे सूत्रांनी सांगितले.
महायुतीने काय करावे हा त्यांचा प्रश्न!
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वत:वर वेळ येते, तेव्हा स्वाभिमान आणि अभिमान दाखवावा लागतो, असे सांगत त्यांनी काँग्रेस खा. वर्षा गायकवाड, खा. प्रतिभा धानोरकर, खा. शोभा बच्छाव यांचे मराठी स्वाभिमान दाखविल्याबद्दल अभिनंदन केले.
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांनी हिंदी चित्रपटात काम करूनही मातृभाषेबद्दल ठाम भूमिका घेतल्याबद्दल आभार मानले. महापालिका निवडणुकीत महायुती व महाआघाडीने काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. मनसे आपले काम करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.