Raj Thackeray : मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 21:09 IST2023-05-06T20:46:04+5:302023-05-06T21:09:36+5:30
MNS Raj Thackeray Slams Uddhav Thackeray : "कोकणासारख्या भागात आम्ही भांडतोय, वाद चालू आहे. नवीन बारसू कुठून आलं?, मला वाटलं नाणारचं नाव बदललं."

Raj Thackeray : मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत आज सभा झाली. "मी कोकणच्या दौऱ्यावर आलो असताना मी सभा घेणार असल्याचं सांगितलं होतं. पहिल्यांदा रत्नागिरी शहर निवडू असं म्हटलं. कोकणासारख्या भागात आम्ही भांडतोय, वाद चालू आहे. नवीन बारसू कुठून आलं?, मला वाटलं नाणारचं नाव बदललं. तुमच्या पायाखालून जमीन निसटून जाते. समजत नाही तुम्हाला?, कोणतरी विकत घेतंय. लोकप्रतिनिधींना पहिल्यांदा कळतं. व्यापार चालू आहे सगळा... जमीन विकताना कळलं नाही का तुम्हाला?" असा सवाल राज ठाकरे यांनी कोकणवासियांना केला आहे.
बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बारसूच्या दौऱ्यावर आहेत. हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, असं आव्हान ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. यावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष येऊन गेले. आता सांगतात जी लोकांची भावना ती आमची भावना" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"बाळासाहेबांच्या नावाने मुंबईचा महापौर बंगला जो ढापला तो लोकांना विचारून ढापला का? लोक निवडून देतात तेव्हा लोकांचं हित पाहिलंच पाहिजे. लोकांची काळजी घ्यायची असते. हे लोकं लोकांना फसवत आले, मूर्ख बनवत आले. ही माणसं कधी प्रदेशाची धूळधाण करतील हे समजणार नाही. या सर्वातून माझा कोकण वाचवा आणि मी सांगितलेल्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. "दुसरीकडे राजीनाम्याचा विषय सुरू होता तो काल संपला. त्यांना खरंच राजीनामा द्यायचा होता असं मला वाटतं. त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार ज्याप्रकारे वागले ते पवारांच्या डोळ्यादेखत होत असताना मी आता राजीनामा दिला हे असं वागतायत. उद्या ते जसं बोलत होते तसं मलाही सांगतील या भीतीपोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा. होतंय ते बरं होतंय अशा उकळ्या फुटत होत्या. पण तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे" असं राज ठाकरे म्हणाले.