Raj Thackeray : "माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, डोळा मारला की..."; राज ठाकरेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 13:42 IST2025-03-09T13:41:49+5:302025-03-09T13:42:16+5:30
MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Raj Thackeray : "माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, डोळा मारला की..."; राज ठाकरेंचा खोचक टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याच दरम्यान "माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच "खरंतर हा महिला दिन जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे" असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"पक्षाला १९ वर्षे पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडला आहे यांचे आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले. पराभव झाले तरीही या पक्षातील माणसं एकत्र कशी काय राहतात? फेरीवाले कष्ट करत असतात. पण आताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना... तसे माझ्या पक्षात नाहीत. आज या फुटपाथवर, तिकडून कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर. आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही" असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
"आपला पक्ष, संघटना मजबूत करणं महत्त्वाचं"
"आपला पक्ष आणि संघटना मजबूत करणं जास्त महत्त्वाचं आहे. माझा जो गटाध्यक्ष आहे त्याला आणि त्याच्या घरातल्यांनाही वाटलं पाहिजे की माझ्या मुलाची काळजी घेत आहेत. त्याच्याशी बोलत आहेत. दरवर्षी ८ मार्चला महिला दिन साजरा करतो. काल मला एकाने विनोद पाठवला. २१ जून सर्वात मोठा दिवस समजला जातो. हे सर्व झूठ आहे. २१ जून सर्वात मोठा दिवस नाहीच आहे. महिला दिन सर्वात मोठा दिवस आहे. कारण तो ८ मार्चला सुरू होतो आणि पुढच्या वर्षी ७ मार्चला संपतो. ज्यांची लग्न झाली असेल त्यांना कळत असेल मी काय म्हणतोय ते..."
"महिला दिन जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे"
"आपल्याकडे दोन पुरुष आले तरी महिला दिनाच्या शुभेच्छा देतात. अरे यात महिला कुठे आहेत?. मागचा पुढचा विचार नाही, बस शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. पण एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतो. त्या महिलेला विसरतो. खरंतर हा महिला दिन जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. लहान असताना वडील कोणाकडे तरी चाकरी करतात हे ज्या मुलीला पाहवलं नाही, लग्न झाल्यावर आपला पती कुठे तरी मुघलांकडे चाकरी करतो हे त्या स्त्रीला पाहवलं नाही, जिने आपल्या पतीला बंड करायला लावलं."
"आपल्या मुलाकडून स्वराज्य घडवून आणलं"
"जिच्या मनात सुरुवातीच्या मनात स्वराज्य ही गोष्ट पहिल्यापासून होती, तिने आपल्या मुलाकडून स्वराज्य घडवून आणलं. या सर्व इतिहासाच्या मागे एका स्त्रीचं मन होतं. एका महिलेचं मन होतं. ते आपण विसरतो. आज महाराष्ट्रात इतक्या महिला होऊन गेल्या. देशातील पहिली डॉक्टर महिला आनंदीबाई जोशी. आपण या महिलांचा विचार करतो का? इतक्या महिलांचं योगदान आहे खासकरून महाराष्ट्रातून. पुढारलेल्या स्त्रिया इतिहासातील पाहिल्या तर त्या महाराष्ट्रातील मिळतील" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.