मनसेचा नवीन ध्वज वादात; राजमुद्रेसाठी विनोद पाटील देणार कायदेशीर लढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 13:41 IST2020-01-22T13:35:05+5:302020-01-22T13:41:46+5:30
राजमुद्रेचा झेंड्यावर वापर करण्यास सुरुवात केल्यास, राजमुद्रेचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. तरी देखील मनसेकडून राजमुद्रा ध्वजावर घेतल्यास, कायदेशीर काय करता येईल ते पाहू असंही विनोद पाटील म्हणाले.

मनसेचा नवीन ध्वज वादात; राजमुद्रेसाठी विनोद पाटील देणार कायदेशीर लढा
मुंबई - राज्यातील बदलेली राजकीय परिस्थिती पाहता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष देखील नव्या भूमिकेत समोर येण्यास सज्ज झाला आहे. नव्या भूमिकेसह मनसे आपला झेंडा देखील बदलत आहे. मनसेच्या नव्या झेंड्यावर राजमुद्रा घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे समजते.
राजमुद्रा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराजाचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणीही राजमुद्रेचा वापर राजकारणासाठी करू नये, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात विनोद पाटील यांनी राज ठाकरे यांना विनंती पत्र ही पाठवले होते. मात्र त्याचे काहीही उत्तर मिळाले नाही.
मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा घेऊ नये यासाठी विनोद पाटील आक्रमक झाले आहे. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. मात्र राजमुद्रेचा वापर राजकीय पक्षांनी टाळावा. राजमुद्रेचा झेंड्यावर वापर करण्यास सुरुवात केल्यास, राजमुद्रेचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. तरी देखील मनसेकडून राजमुद्रा ध्वजावर घेतल्यास, कायदेशीर काय करता येईल ते पाहू असंही विनोद पाटील म्हणाले. किंबहुना राज्य सरकार आणि केंद्र सकारसमोर हा प्रश्न उपस्थित करू असही पाटील म्हणाले.