“उद्धव ठाकरेंना कार्यकारी प्रमुख बनवले ही राजसाहेबांची मेहेरबानी”; सेनेच्या टीकेला मनसेचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 04:22 PM2022-05-13T16:22:03+5:302022-05-13T16:47:40+5:30

बाळासाहेब ठाकरेंना 'हिंदुहृदयसम्राट' ही उपाधी ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिली होती का, अशी विचारणा मनसेने केली आहे.

mns leader kirtikumar shinde replied shiv sena deepali sayyed over criticism over raj thackeray and amit thackeray | “उद्धव ठाकरेंना कार्यकारी प्रमुख बनवले ही राजसाहेबांची मेहेरबानी”; सेनेच्या टीकेला मनसेचे उत्तर

“उद्धव ठाकरेंना कार्यकारी प्रमुख बनवले ही राजसाहेबांची मेहेरबानी”; सेनेच्या टीकेला मनसेचे उत्तर

Next

मुंबई:मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लागोपाठ घेतलेल्या सभा, मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेली ठाम भूमिका, हनुमान चालिसा लावण्याचे केलेले आवाहन आणि जाहीर केलेला अयोध्या दौरा यानंतर शिवसेना आणि मनसेमधील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहे. यातच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) याही मनसेवर निशाणा साधत करत असून, अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. अमित ठाकरे यांना नोटीस पाठवली नाही ही उद्धवसाहेबांची मेहेरबानी राज साहेबांनी विसरू नये, सहनशीलता ही निवडणुकीत दाखवायची असते. स्वयंघोषित हिंदुजननायक करून ताम्रपट मिळत नाही, या शब्दांत दीपाली सय्यद यांनी मनसेवर निशाणा साधला होता. 

उद्धव ठाकरेंना कार्यकारी प्रमुख बनवले ही राजसाहेबांची मेहेरबानी

शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनात राजसाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना कार्यकारी प्रमुख बनवावे, हा ठराव मांडला होता; याला म्हणतात 'मेहरबानी'!, असे प्रत्युत्तर देत, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना 'हिंदुहृदयसम्राट' ही उपाधी ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिली होती का? असा सवालही कीर्तिकुमार शिंदे यांनी केला आहे. तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको, असे म्हणत दीपाली सय्यद यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. 

दीपाली सय्यद नावाच्या एक बाई जाणूनबुजून टीका करतायत

दीपाली सय्यद नावाच्या एक बाई जाणूनबुजून 'सुपारी' घेतल्याप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते अमित ठाकरे यांच्यावर बिनबुडाची टीका करत आहेत. आता तर त्यांनी हद्दच केली. अमित ठाकरे यांना नोटीस पाठवली नाही ही उद्धव साहेबांची मेहरबानी राज साहेबांनी विसरू नये, असा नवीन 'उपदेश'शोध त्यांनी लावला आहे. कदाचित त्यांना 'मेहरबानी' या शब्दाचा अर्थ माहीत नसेल. मेहरबानी या शब्दाचा अर्थ त्यांना नीट समजावा यासाठी त्यांना (आणि त्यांना ही सुपारी देणाऱ्यांना) समजेल असे उदाहरण देतो. सक्रीय राजकारणाचा कोणताही पुरेसा अनुभव गाठीशी नसताना, फोटोग्राफी करत जंगलात फिरणाऱ्या उद्धव ठाकरे यांना कै. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार- उत्तराधिकारी व्हायचे होते. तेव्हा शिवसेनेच्या राजकारणात सक्रीय होऊन राजसाहेबांना दीड दशक झाले होते. अक्षरशः शेकडो सभा घेत राजसाहेबांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता, अनेकदा. अवघा महाराष्ट्र तेव्हा राज ठाकरेंना 'पुढचे बाळासाहेब' - 'पुढचे शिवसेनाप्रमुख' बघत होता. तरीही, तेव्हा फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या प्रेमाखातर शिवसेनेच्या तथाकथित ऐतिहासिक महाबळेश्वर अधिवेशनात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना कार्याध्यक्ष बनवण्यात यावे,  यासाठीचा ठराव मांडला होता. स्वतःच्या हक्काची जागा दुसऱ्याला 'दान' केली जाते त्याला म्हणतात, 'मेहरबानी'! खूप मोठे विशाल हृदय लागते त्याला!!, असे कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 

आता आदित्य ठाकरेंचे उदाहरण घ्या...

या उदाहरणाने अक्कल आली नसेल तर सय्यदबाईंसाठी आणखी एक उदाहरण देतो, त्यांच्या लाडक्या आदित्यचे. 'ठाकरे' घराण्यातला आदित्य विधानसभा निवडणुकीत निर्विघ्नपणे निवडून यावा, यासाठी राजसाहेब ठाकरे यांनी वरळीत मनसेचा उमेदवार दिला नव्हता. मनसेचे उमेदवार संतोष धुरी यांनी तेव्हा निवडणूक लढवली असती तर हा 'आदित्य' वरळीतच कायमचा मावळला असता! याला म्हणतात, 'मेहरबानी'!!, या शब्दांत शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे. 

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केले असून, राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे. मोदींना खूश करण्याकरिता जीवाचे रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरिता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचित माफीनाम्याची गरज पडणार नाही, असा खोचक सल्ला देणारे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे. 
 

Web Title: mns leader kirtikumar shinde replied shiv sena deepali sayyed over criticism over raj thackeray and amit thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.