Raj Thackeray : "एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच;" राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 20:41 IST2022-04-02T20:41:18+5:302022-04-02T20:41:59+5:30
मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार असा सवालही राज ठाकरे यांनी केला. जनता सगळं विसरते याचाच ते फायदा घेतात : राज ठाकरे

Raj Thackeray : "एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच;" राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. जसा कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन आता विस्मरणात गेला, तशा अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. परंतु त्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनाही आपण विसरलो. २०१९ मध्ये झालेली निवडणूकही आपण विसरलो. जे तुम्ही विसरात तेच त्यांच्या फायद्याचं ठरतं असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
"२०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस लढले होते. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेला आणि खासकरून अचानक उद्धव ठाकरे यांना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री बनणार असं ठरलं होतं असा साक्षात्कार झाला. महाराष्ट्रातील सभांमध्ये कधी यावर बोलले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन भाषण करत होते, तेव्हाही व्यासपीठावर बसले होते, तेव्हा पंतप्रधान मुख्यमंत्री भाजपचा मुख्यमंत्री बनेल असं ते म्हणाले त्यावेळी काही बोलले नाही. अमित शाहदेखील बोलले तेव्हाही काही बोलले नाहीत. जेव्हा निकाल लागला आणि आपल्यामुळे सरकार अडतंय हे समजल्यावर अडीच वर्षांचा विषय आला. तेव्हा अमित शाहंशी एकांतात बोललो असं सांगितलं. त्यावेळी बाहेर का नाही बोललात?," असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्राचं आहे, मग ती गोष्ट चार भिंतीत का केली. आमचं असं काही बोलणं झालं नाही हे अमित शाहही सांगतात. एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले लग्न कोणाबरोबर समजेचना. महाराष्ट्राला समजेचना मतदान केलं कोणाला आम्ही. मग नंतर सगळं फिस्कटलं आणि त्यानंतर दोघंही हिसमुसून घरी. एक नंबरचा पक्ष भाजप, दोन नंबरचा शिवसेना आणि तीन नंबरचा राष्ट्रवादी, पण तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरला फिरवतोय. हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रकार मी कधीही पाहिला नाही," असंही ते यावेळी म्हणाले. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार असा सवालही त्यांनी केला.