मुंबई - माझ्यासोबत राहणार असाल तर ठाम राहा. आपल्याला जे महाराष्ट्रात मराठी माणसं आणि हिंदुसाठी करायचे ते करणारच आहे. तुमचा राजकीय अभ्यास दांडगा असला पाहिजे. तुम्ही समोरच्याला पुरून उरलं पाहिजे असं सांगत राज ठाकरेंनीभाजपा नेत्यांच्या गाठीभेटीवरून होणाऱ्या चर्चेवर भाष्य केले.
वरळीतील राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी सांगितले की, मला भाजपचे लोक भेटायला येतात, मी त्यांना काय नाही म्हणू ? तुमच्या घरी चहा प्यायला येतो असं कोणी म्हणलं तर तुम्ही नाही म्हणाल का? बरं माझ्याकडे चहा प्यायला कोणीही आले तरी मी तुम्हाला कधी विकलं नाही, मी पुन्हा सांगतो कोणीही भेटून गेलं तरी तुमच्यावरचं प्रेम आणि पक्षाची भूमिका याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
तसेच १९६६ साली शिवसेनेचा जन्म झाला, शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्ष ते मुस्लिम लीग सोबत युती केली, पुढे काँग्रेससोबत पण युती केली होती. थोडक्यात त्या त्या वेळेला गरज बघून युती केली. सगळ्यांनी भूमिका बदलल्या, वाट्टेल त्या युत्या केल्या..त्या चालतात..पण त्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार..हा कुठला न्याय? भाजपाने महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना पुढे पक्षात घेतलं आणि त्यांना मंत्री केलं. नारायण राणे, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, अशोक चव्हाण आज ज्यांच्यावर आरोप केले ते मंत्रिमंडळात आहेत. मी जे बोललो, ते कधी मागे घेतले नाही. जे बोललो होतो त्याला आधार होते. जे चांगले कराल त्याला चांगले बोलतो, वाईट कराल त्यावर बोललो. फडणवीसांनी, किरीट सोमय्यांनी किती लोकांवर आरोप केले, ते सगळे भाजपमध्ये आले, लोक हल्ली देव पाण्यात घालून बसतात की किरीट सोमय्यांनी किंवा फडणवीसांनी आरोप केले की पक्षात घेतात, पुढे मंत्री करतात. एवढा चिखल झालाय पण त्यांना कुणी पत्रकार विचारणार नाही असं सांगत भूमिका बदलतो या आरोपांवर राज ठाकरेंनी भाष्य केले.
पक्ष संघटनेत आणणार आचारसंहिता
दरम्यान, येत्या काळात पक्षात खालपासून वरपर्यंत आचारसंहिता आणणार आहे. पुढील १५ दिवसांत प्रत्येकाला जबाबदारी आणि आचारसंहिता आखून देईन. मी अनेक पराभव पाहिलेत. पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही. खचलेल्यांचं नेतृत्व मला करायचं नाहीये. माझ्यासोबत राहायचं असेल तर ठाम राहा. या राज्यातील मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी जे करायचं आहे ते मी करणार, ते आपलं स्वप्न आहे. वेळ लागेल पण करणार हे नक्की असं सांगत राज यांनी पक्ष संघटनेत बदलाचे संकेत दिले आहेत.